माढावर ‘स्वाभिमानी’चाच हक्क  – राजू शेट्टी

माढा लोकसभा मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाच दावा राहणार

खासदार राजू शेट्टी

 कराड : लोकसभा निवडणुकीत आघाडी झाली, नाही झाली, तरी माढा लोकसभा मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाच दावा राहणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी येथे बोलताना स्पष्ट केले.

थकीत ‘एफआरपी’प्रश्नी येत्या शुक्रवारी (दि. २९) पुण्यातील साखर संकुलावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी खासदार शेट्टी साताऱ्यात आले असता येथे ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. माढा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन नेते सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात अतिशय अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये मोहिते यांना निसटता विजय मिळाला होता. या निवडणुकीनंतर ‘स्वाभिमानी’ने या मतदारसंघावर आपला दावा कायम ठेवला आहे.

शेट्टी म्हणाले, की काँग्रेसबरोबर आमची आघाडी होईल, नाही होईल. पण माढा मतदारसंघातून आमची संघटना निवडणूक लढवणार आहे. आमचा उमेदवार सर्वाच्या पसंतीचा असेल, असा विश्वास खासदार शेट्टी यांनी दिला. शेट्टी यांच्या या पवित्र्यामुळे भाजपविरोधी एकत्रित आघाडी करण्याच्या हालचालींपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असून तिथेच ‘स्वाभिमानी’ देखील आपला उमेदवार उभा करणार असल्याने जाहीर केले आहे. या मतदारसंघात सोलापूर आणि सातारा जिल्ह्य़ाचा भाग येतो. तसेच या पट्टय़ात ‘स्वाभिमानी’ संघटनेची चांगली शक्ती आहे.

२३ पक्षांचा पाठिंबा

राज्यात २ हजार कोटी रुपयांची थकीत एफआरपीची रक्कम आहे. केंद्र शासनाला जीएसटीमुळे मोठय़ा प्रमाणात कर मिळत आहे. दूध, उसाला दर द्यायला काहीच अवघड नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफीही होऊ शकते. देशातील सरकारला ऊस पिकवणाऱ्यांपेक्षा साखर घेणाऱ्यांची चिंता असल्याची टीका त्यांनी केली. देशात महिन्याला सरासरी २२ लाख टन साखर लागते. सद्य:स्थितीत देशात १६० ते १७० लाख टन साखरेचा साठा शिल्लक असावा, अशी आपली माहिती असल्याचे शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याला देशातील विविध २३ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आता यावर आश्वासने नको तर लोकसभेत मंजुरी हवी असल्याची आग्रही भूमिका शेट्टी यांनी मांडली.

जुन्या सहकाऱ्यांशी भेटीगाठी

‘जुन्या सहकाऱ्यांची भेट होते का?’ या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शेट्टी म्हणाले, की महायुतीतील जुन्या सहकाऱ्यांशी भेट होते. रामदास आठवले, विनायक मेटे यांच्याशी संपर्क आहे. तर, मंत्री महादेव जानकर यांच्याकडे मी जेवायला जातो. आमची लढाई ही तत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swabhimani shetkari saghtana claim madha lok sabha constituency

ताज्या बातम्या