खासदार राजू शेट्टी यांचे सूचक वक्तव्य

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हिटलिस्टवर शिवसेना नव्हे तर भाजप आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. परतूर, रामनगर आणि चनेगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते.

भाजपच्या अच्छे दिनच्या आश्वासनास भुललेला मी एक माणूस होतो, असे सांगून ते म्हणाले, कसे का असेना शिवसेना शेतकऱ्यांचे नाव घेते. शिवसेनेने नेहमीच शेतकऱ्यांची बाजू घेतलेली आहे. त्यांनी सत्तेमधून बाहेर पडावे असे आपले वैयक्तिक मत आहे. आगामी काळात शिवसेना आमच्यासोबत आली तर ते लोकांना आवडेल की नाही ते पाहावे लागेल. आपण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार, हा सध्या तरी चर्चेचाच विषय आहे. शिवसेना भाजपला सोडणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, नाराज मंडळी एकत्र येतात. हा नैसर्गिक नियम आहे.

राज्यातील पीक कर्जमाफीच्या घोषणेस सहा महिने झाले तरी या संदर्भातील लाभार्थी कोण हा संशोधनाचा विषय आहे. कर्जमाफीचे लाभार्थी तर अद्याप आपणास भेटलेले नाहीत. परंतु तक्रारी करणारे अनेक भेटले आहेत. कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना कंपन्यांनी मदत केली पाहिजे. कारण तंत्रज्ञान पुरवठय़ासाठी त्यांनी रॉयल्टी घेतलेली आहे.

ज्यांना शक्य असेल त्यांनी सध्या तरी विक्री करू नये. कारण देशात डाळवर्गीय आणि प्रामुख्याने तुरीचे उत्पादन निम्म्यावर आल्याने तुरीच्या भाववाढीची भविष्यात शक्यता आहे. शेतीमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव आणि शेतकरी कर्जमुक्तीच्या संदर्भातील दोन खासगी विधेयके आपण संसदेत मांडणार आहोत, असेही खासदार शेट्टी म्हणाले.

पालकमंत्री लोणीकरांचा संदर्भ

शेगाव ते पंढरपूर या जालना जिल्ह्य़ातून जाणाऱ्या नियोजित दिंडी मार्गाच्या संदर्भात खासदार शेट्टी म्हणाले, धर्माच्या नावावर भावनिक आवाहन करून शेतकऱ्यांच्या जमिनी फुकट संपादित करणे योग्य नाही. आतापर्यंत जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि आता राष्ट्रीय महामार्ग असे या रस्त्याचे रूपांतरण होत असले तरी त्यासाठी कधीच भूसंपादन झालेले नाही. आता खासगीकरणाच्या माध्यमातून होणाऱ्या या रस्त्याच्या कामात ठेकेदार, अभियंते, मुरुम विक्रेते, फुकट सेवा देणार आहेत काय? मग भावनिक ब्लॅकमेल करून शेतकऱ्यांची जमीन फुकट घेण्याची गरज काय? आम्हाला हे अजिबात मान्य नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. या संदर्भात त्यांनी प्रत्यक्ष नाव घेतले नाही तरी बबनराव लोणीकर यांच्या पालकमंत्रिपदाचा उल्लेख करून भूसंपादनाच्या बाबतीत त्यांचाही संबंध जोडला.

दीडपट हमीभाव हा धादांत खोटेपणा

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे साखरेच्या पाकात बुडविलेले गाजर आहे, असे सांगून खासदार शेट्टी म्हणाले, अनेक घोषणा केल्या तरी त्या संदर्भातील तरतूद मात्र करण्यात आलेली नाही. शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या तूर खरेदीसाठी घातलेली मर्यादा चुकीची आहे. तुरीच्या संदर्भात सरकार व्यापाऱ्यांना पाठीशी घालीत आहे. आवश्यकता भासल्यास तुरीच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करील. रब्बीपासून शेतीमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात येत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेले वक्तव्य धादांत खोटे आहे. ज्या पद्धतीने उत्पादन खर्च काढला ते सूत्र चुकीचे आहे.