सातारा : सातारा जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ या शासकीय अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला. ‘एक दिवस – एक तास – एक साथ श्रमदान’ या ब्रीदाखाली ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी आणि अधिकारी एकत्र आले व शेकडो हातांनी हजारो तासांचे श्रमदान करून गावोगावी स्वच्छतेचा मेळावा घडवून आणला.
जिल्ह्यातील तब्बल १४९५ ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम उत्साहात पार पडला. तालुकास्तरीय महाश्रमदानाचा शुभारंभ व विविध उपक्रमांची सुरुवात वर्णे (ता. सातारा), बोरगाव (ता. कोरेगाव), सातेवाडी (ता. खटाव), टाकेवाडी व मलवडी (ता. माण), राजाळे-कोळकी-साखरवाडी (ता. फलटण), मोर्वे-शिरवळ (ता. खंडाळा), उडतरे (ता. वाई), क्षेत्र महाबळेश्वर व दांडेघर (ता. महाबळेश्वर), करंदी कु.-बामणोली कु. (ता. जावली), तळबीड व सैदापूर (ता. कराड), ढोरोशी-सुतारवाडी-ताईगडेवाडी (ता. पाटण) या ग्रामपंचायतींमध्ये झाला.
या ठिकाणी गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी-कर्मचारी, महिला बचत गट, युवक मंडळे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, आशा व अंगणवाडीसेविका, तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
गावोगावी स्वच्छतेचा जल्लोष
गावांमध्ये स्वच्छता फेरी, मशाल रॅली, सायकल रॅली, स्वच्छता साखळी अशा जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच रस्ते, गटारे, मोकळी जागा, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, बसस्थानके, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे, तलाव, नाले व पानवठे या ठिकाणांची काटेकोर स्वच्छता करण्यात आली. कचरा संकलनासाठी ट्रॅक्टर, घंटागाड्या, झाडू, घमेली, खोरी यांची तयारीही प्रभावीपणे करण्यात आली होती.
सुपने (ता. कराड) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून ग्रामस्थांना प्रेरणा दिली. यावेळी गटविकास अधिकारी प्रताप पाटील, सरपंच विश्रांती पाटील, उपसरपंच दादासाहेब पाटील यांच्यासह गावकरी, महिला बचत गट, युवक मंडळ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“श्रमदान हा संस्कार असून ग्रामस्थांनी एकत्र येऊन कचरा वर्गीकरण व परिसर स्वच्छतेला चालना दिली तर गावे स्वच्छ आणि निरोगी राहतील. उज्ज्वल भविष्य व पर्यावरणासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास स्वच्छतेसाठी द्यायला हवा,” असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सुशासनयुक्त, सक्षम, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गावे निर्माण करण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक आहे. शासनाच्या सर्व योजनांची सांगड घालून गावांचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधला पाहिजे.
जिल्ह्यात स्वच्छतेसाठी शेकडो हात राबून हजारो तास श्रमदान होऊन ‘एक दिवस – एक तास – एक साथ श्रमदान’ मोहीम यशस्वी झाली आहे. प्रत्येक गावात दर आठवड्याला सार्वजनिक स्वच्छतेचा उपक्रम राबवून सातत्य ठेवले पाहिजे. – याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा