विश्वास पवार
वाई : 
लष्करात सेवा बजावणाऱ्या अधिकारी असलेल्या पतीला अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आले. खरे तर ही घटना त्यांच्यासाठी दु:खाचा डोंगर होता. पण या दु:खात रडत राहण्यापेक्षा त्यांनी जिद्दीचे नवे पंख घेतले आणि पतीच्या आठवणींचीच स्वप्ने बांधत भरारी घेतली. स्वाती शेडगे-महाडिक यांच्या जिद्दीची ही कहाणी.

पतीच्या बलिदानानंतरही लष्करात सेवा बजावण्याचे स्वप्न घेतलेल्या महाडिक यांनी प्रचंड मेहनत, कष्ट आणि विविध अभ्यास-सरावांच्या परीक्षा यशस्वीपणे पार करत लष्करात ‘मेजर’पदावर पोहोचल्या आहेत. त्यांच्या या उत्तुंग कामगिरीने साताऱ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हेही वाचा >>>साखर उद्योगावर संकट; इथेनॉलनिर्मितीवरील निर्बंधांमुळे तीन हजार कोटींचा फटका

पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक यांना नोव्हेंबर २०१५ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य आले होते. पतीच्या पार्थिवाच्या साक्षीनेच स्वाती यांनी लष्करात जाऊन देशसेवा करण्याचा संकल्प सोडला आणि त्या जिद्दीने तयारीला लागल्या. त्यात त्यांना यश आले. पहिल्याच टप्प्यात ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड’ची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर त्या ‘२१ पॅरा स्पेशल फोर्स’मध्ये दाखल झाल्या. सप्टेंबर २०१७ मध्ये स्वाती ‘लेफ्टनंट’ बनल्या. एप्रिल २०२० मध्ये त्या कॅप्टनपदावर पोहोचल्या. आता त्या लष्करात ‘मेजर’पदापर्यंत पोहोचल्या आहेत.

पती कर्नल संतोष महाडिक यांना अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य आले होते. त्यांच्या या धीरोदात्त कामगिरीतूनच मीदेखील देशसेवा करत त्यांना आदरांजली वाहण्याचा संकल्प सोडला होता आणि तो मी पूर्ण केला. या प्रवासात मला भारतीय लष्करातील अनेक अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले.- स्वाती शेडगे – महाडिक,मेजर