मुंबई/ठाणे : राज्यात एकीकडे करोनाचा संसर्ग ओसरत असताना दुसरीकडे स्वाईन फ्लू आणि मंकीपॉक्सचा धोका वाढत आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर स्वाईन फ्लूचा फैलाव वेगाने होत आहे. राज्यात २४ जुलैपर्यंत १७३ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात जुलैमध्ये आढळलेल्या २० रुग्णांपैकी गेल्या आठ दिवसांत दोन महिलांचा मृत्यू झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात मंकीपॉक्सचा अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी दिल्ली आणि केरळमध्ये बाधित आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता गृहित धरून मुंबई आणि ठाणे महापालिका प्रशासनाने उपाचार – प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. स्वाइन फ्लू आणि मंकीपॉक्सच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने पार्किंग प्लाझा रुग्णालयात प्रत्येकी ५० खाटांचा स्वतंत्र कक्ष सज्ज केला आहे.  

राज्यात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक म्हणजे ४३ रुग्ण मुंबईत आढळले असून मुंबईतील मृतांची संख्या मात्र शून्य आहे. पुण्यात २३, पालघरमध्ये ३३, नाशिकमध्ये १७, नागपूर शहरात १४, कोल्हापूर शहरात १४, ठाणे शहरात २० आणि कल्याण-डोंबिवली शहरामध्ये सात रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक तीन मृत्यू कोल्हापूरमध्ये झाले आहेत. पुणे आणि ठाणे शहरांमध्ये प्रत्येकी दोन मृत्यूची नोंद झाली आहे.

ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये दोन दिवसांत रुग्णांची संख्या दोनवरून सातवर गेली आहे. दोन दिवसांमध्ये ठाण्यातील बाधित रुग्णांची संख्या सातवरून २० वर गेली आहे. ठाण्यात आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यातील एक महिला ७१ वर्षीय होती, तर दुसरी ५१ वर्षांची होती. या दोघी १४ जुलैला रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यातील ७१ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिला स्वाईनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. ५१ वर्षीय महिलेचा १८ जुलैला तर, ७१ वर्षीय महिलेचा १९ जुलैला मृत्यू झाल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. स्वाइन फ्लू आणि मंकीपॉक्सच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठाण्यात पार्कीग प्लाझा रुग्णालयात प्रत्येकी ५० खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार केल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तसेच स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित चाचणी करून घ्यावी. तसेच करोना नियमावलीप्रमाणेच स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या उपमुख्य आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता हमरस्कर यांनी केले.

दरम्यान, राज्यात स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी सर्वेक्षण, प्रतिबंध आणि आवश्यक उपायोजना अंमलात आणल्या जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. मंकीपॉक्स रुग्णांचे निदान, संसर्ग प्रतिबंध आणि उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनाही आरोग्य विभागाने जाहीर केल्या आहेत. मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये (एनआयव्ही) पाठविण्याचेही त्यात सूचित केले आहे. रुग्णालयातील सर्वेक्षणावर लक्ष केंद्रीत करताना त्वचारोग आणि गुप्तरोग विभाग, औषधशास्त्र आणि बालरोग विभागातील येणाऱ्या रुग्णांच्या सर्वेक्षणावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परदेशातून येणाऱ्यांची चाचणी

मंकीपॉक्स हा आजार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमार्फत पसरण्याचा धोका असल्याने प्रतिबंधासाठी मुंबई पालिकेने पावले उचलली आहेत. या आजाराचा उद्रेक झालेल्या देशांतून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

स्वाईन फ्लूची लक्षणे

* नतीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे.

* घशामध्ये खवखव, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी.

* बहुसंख्य लोक सर्वसाधारणपणे चार ते पाच दिवसांत बरे होतात.

* गुंतागुंत वाढल्यास छातीत वेदना, खोकल्यातून रक्त, दम लागणे, अतितीव्र ताप, शुष्कता (डिहायड्रेशन), बेशुद्धावस्था. 

मंकीपॉक्सची लक्षणे

* ताप, थंडी, कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथीना सूज, डोकेदुखी, अंगदुखी.

* घाम येणे, घसा खवखवणे, खोकला, अंगावर पुरळ, खूप थकवा. हा आजार २ ते ४ आठवडय़ांत बरा होतो.

* लहान मुले आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांमध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

* गुंतागुंत वाढल्यास न्युमोनिया, सेप्सिस, मेंदुतील गुंतागुंत, दृष्टीपटलाला संसर्गाची भीती.

ठाण्यातील स्थिती, उपाययोजना

* शहरात जुलैमध्ये स्वाईन फ्लूचे २० रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू, १५ रुग्ण आजारमुक्त.

* रुग्ण आढळलेल्या परिसरात आतापर्यंत १२ हजार घरांचे सर्वेक्षण, एकही रुग्णनोंद नाही.

* स्वाईन फ्लू, मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी पार्कीग प्लाझा रुग्णालयात प्रत्येकी ५० खाटांचा स्वतंत्र कक्ष.

* माजिवडा येथील करोनापश्चात उपचार केंद्रामध्ये स्वाईन फ्लूच्या तपासणीसाठी लवकरच केंद्र.

मुंबईतील स्थिती, खबरदारी

स्वाईन फ्लूचे सर्वाधिक म्हणजे ४३ रुग्ण मुंबईत आढळले, मृतांची संख्या मात्र शून्य.

कस्तुरबा रुग्णालयात मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी २८ खाटांचा स्वतंत्र कक्ष.

मंकीपॉक्सचा उद्रेक झालेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच चाचणी.

कस्तुरबामध्ये स्वतंत्र मंकीपॉक्स कक्ष

संसर्गजन्य आजारांसाठीच्या कस्तुरबा रुग्णालयातही मंकीपॉक्सच्या उपचारांची व्यवस्था पालिकेने केली आहे. संशयित रुग्णांना विलगीकरणासाठी २८ खाटांचा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. दाखल झालेल्या रुग्णांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात येणार आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचनाही आरोग्य यंत्रणांना पालिकेने दिल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu infections rising in maharashtra swine flu cases in mumbai zws
First published on: 26-07-2022 at 06:19 IST