सांगली : मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी तासगाव येथील रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. गणेश चतुर्थींनंतर ऋषीपंचमीला तासगाव येथे रथोत्सवाची गेल्या २४५ वर्षांची परंपरा असून, गणेश आपले पिता काशी विश्वेश्वर यांच्या भेटीसाठी रथातून जातात, अशी प्रथा आजपर्यंत पाळली जात आहे. तासगावमध्ये आज तीन मजली रथातून गणेशाची पंचधातूची मूर्ती काशी मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत नेण्यात येते. हा रथ दोरखंडाच्या मदतीने गणेशभक्त ओढत नेतात. आजही पारंपरिक पद्धतीने तासगावचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

केळीच्या खुंट, फुले आणि नारळाच्या तोरणाने सजविलेल्या रथामध्ये तासगावचे संस्थानिक राजेंद्र पटवर्धन, आदिती पटवर्धन यांच्यासह मानकरी होते. तसेच या रथोत्सवात मंत्री शंभूराज देसाई, आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, चंद्रहार पाटील आदी उपस्थित होते. झांजपथक, ढोलताशांचा निनादात मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात दुपारी एक वाजता रथोत्सवाला सुरुवात झाली. रथापुढे तरुणांनी मानवी मनोरा करत गणेशाला वंदन केले. यावेळी भाविकांकडून रथावर खारीक, खोबरे आणि पेढे यांची उधळण करण्यात येत होती. काशी विश्वेश्वर मंदिराजवळ आरती झाल्यानंतर रथाचा परतीचा प्रवास पूर्ण करण्यात आला.

तासगावचा रथोत्सव पाहण्यासाठी सांगलीसह कोल्हापूर, बेळगाव, कराड, सातारा या ठिकाणाहून गणेशभक्तांनी हजेरी लावली. रथोत्सव शांततेत पार पडावा यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात आली होती. मणेराजुरी, सांगलीकडून येणारे वाहनांसाठी कॉलेज कार्नर, भिलवडी नाका ते बसस्थानक असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. रथोत्सवामुळे गणेश मंदिर परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.