अलिबाग: राज्यातील सर्व जिल्ह्यात टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने कौशल्य वर्धन केंद्रांची उभारणी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केली आहे. नेमका काय आहे हा प्रकल्प आणि त्याचा कसा फायदा स्थानिकांना होणार हे जाणून घेऊयात.
उद्योग आणि व्यवसायांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी ट्रीपल आय टी केंद्र विकसित करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. टाटा कन्सलटन्सीच्या माध्यमातून ही केंद्र विकसित केली जाणार आहे. कोकणातील रत्नागिरी पाठोपाठा आता रायगड जिल्ह्यातील रोहा येथे कौशल्य वर्धन केंद्राचा भूमीपुजन समारंभ नुकताच पार पडला.
रोहा येथील कौशल्यवर्धन केंद्राबाबत माहिती
टाटा टेक्रॉलॉजी लिमिटेड यांनी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी व औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी हा प्रकल्प एम आय डी सी सोबत करण्याचा मानस व्यक्त केला होता. या प्रकल्पांमध्ये दरवर्षी अंदाजे तीन हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाची एकूण रक्कम इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चासहित रुपये ११५ कोटी इतकी आहे. एकूण रक्कमेपैकी रुपये अंदाजे ९८ कोटी रक्कम टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे व उर्वरित खर्च रुपये १७ कोटी (वस्तु व सेवाकर बगळून) एमआयडीसीच्या महामंडळाकडून संचालक मंडळाच्या मान्यतेने उपलब्ध करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक जागा रोहा नगरपालिकेमार्फत १८ हजार ५०० फुट (म्हणजेच १ हजार ७०० चौ.मी.) जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कौशल्यवर्धन केंद्र (सेंटर फॉर इनोव्हशन अँण्ड इनक्युबेशन अँण्ड ट्रेनिंग सेंटर अर्थात सी ट्रिपल आय टी ची ) १२ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळाची इमारत टाटा मार्फत उभारणी करण्यात येणार आहे. प्रस्तावित कौशल्यवर्धन केंद्र इमारतीचे इमारत नकाशे मंजुरी रोहा महानगरपालिकेमार्फत अंतिम टप्प्यात असून त्यानुसार लवकरच इमारत बांधकामास सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाची इमारत मे २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी करण्यात येणाःया बांधकामासह तेथे उपलब्ध होणाऱ्या सर्व मशीनरी, औद्योगिक हार्डवेअर, व्यावसायिक तंत्रज्ञान साधने आणि यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर व इतर सर्व वस्तूंचे हस्तांतरण महामंडळास होणार आहे व सदरचे प्रशिक्षण केंद्र टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचे मार्फत संचालित करण्यात येणार आहे. केंद्रमार्फत ९ अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत.
याच धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यात सी ट्रीपल आय टी सेंटर्स उभारली जाणार आहे. ज्याचा उपयोग तरुणांना कौशल्य वृध्दीसाठी होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना या प्रकल्पाचा फायदा होणार असून, त्याद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून दरवर्षी ३ हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेवून कोर्स पूर्ण करणार आहेत त्यामुळे ही केंद्र कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्वाची ठरतील असा विश्वास अजित पवार यांनी कौशल्य वर्धन केंद्राच्या भूमीपूजन सोहळ्या दरम्यान रोहा येथे व्यक्त केला होता.