अहिल्यानगर : पुरातन देवस्थान तुमचे की आमचे, यावर वाद होऊन दोन वर्षांपूर्वी उद्भवलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा गावात आता दैनंदिन व्यवहार सुरळीत असल्याने, वातावरण निवळलेले दिसते. पण, तरीही मधे-मधे एका विशिष्ट समुदायावर आर्थिक बहिष्कार घातल्याची चर्चा होते. हे बरेचसे व्यक्तिगत पातळीवर असल्याचे दुसऱ्या समुदायाचे म्हणणे. याने मात्र काही काळ तळ ढवळतो आणि थोडी अस्वस्थता वर येते. पण, गेल्या दोन वर्षांत गावाने कोणताही अनुचित प्रकार घडू दिलेला नाही.

नगर शहराकडून शिर्डीकडे जाताना मध्ये मनमाड रस्त्यावर गुहा (ता. राहुरी) गाव आहे. लोकसंख्या सुमारे सात हजार. गावातील पुरातन देवस्थानाची एका गटाकडून वक्फकडे हजरत रमजान शाहबाबा दर्गाह अशी नोंदणी झालेली आहे, तर धर्मादाय आयुक्तांकडे कान्होबा ऊर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट अशी नोंद करण्यात आली आहे. यावरून वाद सुरू आहेत. त्याचे पर्यवसान दोन वर्षांपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यात झाले होते. आता हा वाद न्यायप्रविष्ट असून, निकाल प्रलंबित आहे. देवस्थानाचा उत्सव पूर्वी एकत्रित साजरा व्हायचा, आता उत्सवासाठी पोलीस बंदोबस्त आवश्यक झाला. त्यामुळे देवस्थानाच्या शेजारीच कायमस्वरूपी पोलीस चौकी थाटण्यात आली.

या वादातूनच गावातील एका समुदायाचे काही जण दुसऱ्या समुदायाशी आर्थिक व्यवहार करेनासे झाले, असा काहीजण दावा करतात. पण, हे व्यक्तिगत पातळीवर, असा दुसऱ्या बाजूचा त्यावर प्रतिदावा. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर समझोता घडवण्याचे प्रयत्न झाले. देवस्थानाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तेथील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय झाला. आता एक गट आपल्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर गेले ५३५ दिवस धरणे आंदोलन करत आहे.

आता गावात शांतता असली, तरी वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी, राजकीय नेते, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते गुहा गावास या वादाच्या निमित्ताने भेटी देतात. त्या वेळी वादाचे विषय पुन्हा चर्चिले जातात. आर्थिक बहिष्काराचा विषयही त्यातलाच. व्यवसायानिमित्त होणारे आर्थिक व्यवहार बंद झाल्याने एका समुदायाच्या काही कुटुंबांनी स्थलांतर केले, असा दावा केला जातो. मात्र, हे स्थलांतर अन्य कारणांनी केले गेल्याची, तसेच आर्थिक व्यवहार ही व्यक्तिगत बाब असल्याची बाजूही दुसऱ्या समुदायाकडून मांडली जाते. गावात थेट कुणावरही आर्थिक बहिष्कारासारखा प्रकार नसल्याचे सांगितले जाते. जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षकही, अलीकडच्या काळात त्यांच्याकडे अशी कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट करतात.

देवस्थानासंदर्भातील वाद न्यायप्रविष्ट आहे. मात्र, व्यक्तिगत पातळीवरील व्यवहार थांबवले गेले, अशी कोणतीही माहिती नाही. तसे असेल, तर दोन्ही बाजूंना एकत्र बोलावून त्यांच्याशी संवाद साधून मार्ग काढता येईल. – डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी

अलीकडच्या काळात गुहा गावात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्यास सांगितले गेले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सबुरीची भूमिका ठेवणे आवश्यक आहे. – सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस अधीक्षक

कोट ३ देवस्थानावरून गावात दोन-तीन वर्षांपूर्वी वाद झाले. त्यानंतर कोणतीही घटना घडलेली नाही. ज्यांच्यामध्ये वैयक्तिक वाद आहेत, तेच केवळ एकमेकांकडे जात नाहीत. हा काही गावाचा, ग्रामपंचायतीचा निर्णय वा ठराव नाही.- करुणा ओहोळ, सरपंच, गुहा

देवस्थानाचे रितीरिवाज पुन्हा आमच्या पद्धतीने पाळू द्यावेत, त्यासाठी देवस्थानामध्ये केलेले बदल काढावेत. – दिलावर शेख,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरातन देवस्थान कानिफनाथांचे आहे. त्याच्या नावात बदल करण्यात आला. त्याविरोधात आम्ही जागृती करत आहोत. शासकीय जुन्या कागदपत्रांत कानिफनाथ देवस्थान नोंद आहे.- नंदकुमार सौदागर, अध्यक्ष व श्रीहरी आंबेकर, सचिव, कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, गुहा