चौथीमध्ये शिकत असणाऱ्या बीडमधील मंगेश वाळके या विद्यार्थ्याने लिहिलेले ‘माझे पाप्पा’ हा निबंध सोशल नेटवर्कींग व्हायरल झाल्यानंतर आता महाराष्ट्र शासनाने मंगेशला मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी या व्हायरल निबंधाची दखल घेतली आहे. वडीलांचे छत्र हरपलेल्या मंगेशने आपली आई दिव्यांग असल्याचे निबंधात म्हटलं आहे. त्यामुळे आता मुंडे यांनी मंगेशच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या दिव्यांग कल्याण निधीमधून आर्थिक मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहे हा मंगेश वाळके?

दहा वर्षीय मंगेश वाळकेवाडीतल्या शाळेत शिकतो. गेल्या महिन्यात मंगेशच्या वडिलांचं क्षयरोगानं (टीबी) निधन झालं. वडिलाच्या दुखातून अजून त्याचं कुटुंब सावरलेलं नाही. अशातच चौथीत असलेल्या मंगेशवर माझे वडील या विषयावर निबंध लिहिण्याची वेळ आली. या विषयावर लिहिताना त्याने, “माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टीबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीनं मला मामाच्या गावाला पाठवलं होतं. माझे पप्पा वारले,” असं सांगत आपल्या वडिलांबद्दल लिहिले होते. त्याचा हा निबंध सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

मंगेशनं लिहिलेल्या निबंधात काय होतं?

“माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टीबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीनं मला मामाच्या गावाला पाठवलं होतं. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे. वही, पेन आणायचे. माझा लाड करत होते. मला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा १८ ला वारले. माझी मम्मी खूप रडली. मी बी लई रडलो. तेव्हा आमच्या घरी पाव्हणे आले होते. माझे पप्पा खूप मायाळू होते. ते म्हणायचे मंगेश तू शिकून मोठा साहेब हो. पप्पा घरात नसल्यावर कोणीच कोणाला मदत करत नाही. त्यांनी एकदा खोल पाण्यातून आमच्या गाईला काढले. मला पप्पांची आठवण येते. रात्रीच्याला आम्हाला चोरांची भीती वाटते. पप्पा तुम्ही लवकर परत या…” असं मंगेशने आपल्या निबंधामध्ये लिहिलं होतं.

निबंध व्हायरल कसा झाला?

मंगेशने निबंधामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्याची आई म्हणजेच शारदा वाळके या दिव्यांग आहेत. त्याच्या कुटुंबामध्ये कोणीही कमावती व्यक्ती नाही. त्यामुळे या दोघांना दोन वेळेच्या जेवणासाठीही अपार कष्ट करावे लागतात. मंगेशने आपल्या निबंधातून मांडलेली व्यथा त्याच्या शिक्षिकेने सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केली. त्यानंतर हा निबंध व्हायरल झाला. या निबंधाची दखल आता थेट राज्य शासनाने घेतील आहे.

मुंडेंनी काय आदेश दिले?

मुंडे यांना मंगेशच्या परिस्थितीबद्दल समजल्यानंतर त्यांनी तात्काळ मंगेशला मदत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. समाज कल्याण विभागामार्फत ‘दिव्यांग बीज भांडवल योजने’अंतर्गत वाळके कुटुंबाला दीड लाखांचे स्वयंरोजगार अर्थ सहाय्य करण्याचे आदेश मुंडे यांनी दिले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीमधून शेष पाच टक्के, बसचा पास, यूडीआयडी कार्ड आणि दिव्यांग महामंडळामार्फत रोजगारासंदर्भातील आर्थिक मदत करण्याचे आदेश मुंडे यांनी संबंधित विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना दिले आहेत. थेट सामाजिक न्याय मंत्र्यांच्या आदेशामुळे सर्व विभागांनी कारवाई सुरु केली असून लवकरच वाळके कुटुंबाला आर्थिक मदत केली जाणार असल्याचे समजते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten year old mangesh walke to get help from dhananjay munde state gov after his essay went viral scsg
First published on: 20-01-2020 at 11:02 IST