कर्जत : तालुक्यातील राशीन येथे महात्मा ज्योतिराव फुले चौकात काल रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भगवा ध्वज लावण्यात आला. यामुळे चौकात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. त्यानंतर आज, सोमवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर सकल ओबीसी समाज व क्रांतिसूर्य महात्मा फुले फाउंडेशनने जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या देत रास्ता रोको आंदोलनही केले.
राशीन येथे बैठक घेण्यात येईल, तोपर्यंत महात्मा फुले चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे आश्वासन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. क्रांतिसूर्य महात्मा फुले फाउंडेशनने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, महात्मा फुले चौकाचे काही लोकांनी धर्मवीर संभाजी महाराज चौक नामकरण करण्याच्या उद्देशाने व दोन समाजात दरी निर्माण करण्याच्या उद्देशाने काल मध्यरात्री भगवा ध्वज पोलीस बंदोबस्तात फडकवला. जल्लोष केला.
पूर्वी करमाळा चौक असे नाव असताना व गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून तेथे महात्मा फुले जयंती, पुण्यतिथी साजरी केली जात असल्याने या चौकाला राशीन ग्रामपंचायतीने रितसर ग्रामसभेचा ठराव घेऊन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असे नामकरण केले. दरवर्षी फुले यांची जयंती उत्सव, पुण्यतिथी व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव व पुण्यतिथी साजरी केली जाते. सकल ओबीसी समाज हा मराठा समाजाला कायमच मोठ्या भावाप्रमाणे मानतो. परंतु ओबीसी समाजावर अन्याय करत पोलीस बंदोबस्तात संभाजी महाराज चौक असा नामोल्लेख करण्याच्या उद्देशाने झेंडा फडकवला, असे निवेदनात म्हटले आहे.
चौकाचे नाव बदलण्याचा हेतू नाही
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे मराठा समाजासाठी आराध्य दैवत आहे. त्यामुळे राशीन येथील चौकाचे नाव बदलण्याचा कोणताही विचार किंवा प्रक्रिया नाही. चौकामध्ये जो भगवा ध्वज आहे तो त्या ठिकाणी उभा करण्यात आला आहे. त्या परिसराला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा कोणताही हेतू नाही. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हेच नाव कायम राहील. ते बदलण्याचा कोणी प्रयत्न केला तर सकल मराठा समाज त्याला विरोध करेल. या प्रकरणी पोलीस व काही विघ्नसंतोषींनी जाणीवपूर्वक अपप्रचार करून तणाव निर्माण करण्याचे काम केले. त्याचा आम्ही निषेध करतो. – वैभव लाळगे व रावसाहेब धांडे समन्वयक, सकल मराठा समाज.