कराड : समाजमाध्यमांवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यावरून सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात रविवारी रात्री संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यात एक ठार, तर दहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एक गंभीर आहे. जमावाने अनेक घरे, दुकानांची जोळपोळ केली आणि एका प्रार्थनास्थळावरही हल्ला केला. या घटनेनंतर पुसेसावळी परिसरात संचारबंदी, तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली असून २३ जणांना अटक केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील ‘इंटरनेट सेवा’ पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत तणावाचे वातावरण आहे.

खटाव तालुक्यातील पुसेसावळी या गावामध्ये रविवारी समाजमाध्यमांवर एका समुदायाच्या काही जणांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याचे उघड झाले. त्यामुळे काही वेळातच सगळीकडे तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री साडेनऊच्या सुमारास तरुणांच्या संतप्त  जमावाने या घटनेशी संबंधित भागातील काही घरे, दुकाने आणि वाहनांना आग लावली. या जमावाने एका प्रार्थनास्थळावरही हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सातारा आणि कराड येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलिसांच्या मदतीला सातारा, सांगली जिल्ह्यातूनही अतिरिक्त पोलीस कुमक दाखल झाली. काही वेळातच संतप्त झालेल्या जमावास पोलिसांनी नियंत्रणात आणले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय घडले?

  • रविवारी रात्री समाजमाध्यमावर काहींनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला.
  • या मजकुराबद्दलची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि तणाव निर्माण झाला.
  • रात्री साडेनऊच्या सुमारास संतप्त तरुणांच्या जमावाने घरे, दुकाने आणि वाहनांना आग लावली.
  • जमावाने एका प्रार्थनास्थळावरही हल्ला केला, या धुमश्चक्रीत एकाचा मृत्यू झाला.

२३ जणांना अटक

दंगलप्रकरणी आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, सामाजिक सलोखा, शांतता राखा, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे. खासदार उदयनराजे यांनीही पुसेसावळीला भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.