प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा आज शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात सामील झाला. २००४ साली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करून गोविंदा लोकसभेत दाखल झाला होता. मात्र पाचच वर्षात त्याने राजकारणातून माघार घेतली. त्यानंतर त्याने अनेक वर्षे राजकारणापासून अंतर राखलं होतं. परंतु, गोविंदाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (बाळासाहेबांची शिवसेना) प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, गोविंदाला शिवसेनेकडून मुंबईतल्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात आहे. परंतु, एकनाथ शिंदे आणि गोविंदाने या खोट्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. गोविंदा सध्या केवळ पक्षासाठी आणि आगामी निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी काम करेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून गोविंदा आणि शिवसेनेवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले, गोविंदा यांचे चित्रपट आता चालत नाहीत. त्यांचा शेवटचा चित्रपट आपटल्यानंतर त्यांना काहीतरी हवं होतं. तसेच शिंदे गटाने एखादा चालणारा तरी नट घ्यायला हवा होता.

राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटानेही या पक्षप्रवेशावरून शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. ठाकरे गटाने ‘लोकसत्ता’च्या वेबसाईटवरील एक जुनी बातमी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे की, शिंदे गटाने भाजपाला विचारून गोविंदाचा पक्षप्रवेश करून घेतलाय ना? ज्या गोविंदावर भाजपाने ‘दाऊदची मदत’ घेतल्याचे आरोप केले होते, त्या गोविंदाला पक्षात घेताना भाजपाला नक्की विचारलंय ना?

नेमकं प्रकरण काय?

गोविंदाने २००४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपा नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. त्या पराभवनानंतर राम नाईक यांनी म्हटलं होतं की, गोविंदाने त्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि बांधकाम व्यावसायिक हितेन ठाकूर यांची मदत घेतली होती.

हे ही वाचा >> त्यावेळी मला हरविण्यासाठी गोविंदाने दाऊदची मदत घेतली होती – राम नाईक

राम नाईक उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना २०१६ मध्ये त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आलं होतं. या आत्मचरित्रात त्यांनी दावा केला आहे की, २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी अभिनेता गोविंदा याने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि बांधकाम व्यावसायिक हितेन ठाकूर यांची मदत घेतली होती. नाईक यांनी त्यांच्या ‘चरैवेति..चरैवेति’ या आत्मचरित्रात हा दावा केला आहे. आठ वर्षांपूर्वी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. राजकीय नेत्यांच्या जुगलबंदीमुळे हा सोहळा चांगलाच गाजला होता. याच बातमीचा फोटो ठाकरे गटाने एक्सवर शेअर केला आहे.