Thackeray Family : महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लक्षात घेतला तर दोन घराणी अत्यंत महत्त्वाची आहेत. एक म्हणजे ठाकरे घराणं दुसरं म्हणजे पवार घराणं. शरद पवार यांनी आजच सांगितलं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात ते ५६ वर्षांपासून सक्रिय आहेत. दरम्यान ठाकरे कुटुंबातील दोन भाऊ म्हणजेच राज आणि उद्धव ठाकरे ५ जुलैला झालेल्या विजयी मेळाव्यात एकत्र आल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. प्रबोधनकार ठाकरे ते अमित ठाकरे अशी चार पिढ्यांची मोठी परंपरा ठाकरे कुटुंबाची आहे. आपण जाणून घेऊ ‘ठाकरे’ कुटुंबातील नाती कशी आहेत.

प्रबोधनकार ठाकरे

प्रबोधनकार ठाकरे यांचं खरं नाव केशव सीताराम ठाकरे असं होतं. त्यांचा जन्म १८८५ मध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये झाला. महात्मा फुले यांना ते आदर्श मानत होते. तसंच ते पत्रकार, समाजसुधारक, वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले महत्त्वाचे नेते होते. तसंच इतिहास संशोधनाचं कामही त्यांनी केलं. प्रबोधनकार ठाकरे यांचा विवाह रमाबाई ठाकरे यांच्याशी झाला. बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे ही या दाम्पत्याची दोन मुलं. महाराष्ट्रातील मराठी माणसाला स्वाभिमान काय असतो ते सांगणारं व्यक्तिमत्व आणि शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची कारकीर्द फार मोठी ठरली. महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाचं नाव वडिलांप्रमाणेच पुढे नेण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं. तर श्रीकांत ठाकरे हे त्यांचे बंधू. त्यांना संगीत विषयाची मोठी जाण होती. अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंची पुढची पिढी

बाळासाहेब ठाकरेंची पुढची पिढी म्हणजे बिंदुमाधव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही तीन मुलं. बिंदुमाधव ठाकरे यांची पत्नी माधवी ठाकरे आणि त्यांना दोन मुलं निहार ठाकरे आणि नेहा ठाकरे. जयदेव ठाकरे यांचे तीन विवाह झाले. जयदेव ठाकरेंच्या तीन पत्नी म्हणजे जयश्री ठाकरे, स्मिता ठाकरे, अनुराधा ठाकरे. या तिघींपासून जयदेव ठाकरेंना चार मुलं आहेत. ज्यांची नावं जयदीप ठाकरे, राहुल ठाकरे, ऐश्वर्य ठाकरे, माधुरी ठाकरे अशी आहेत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे तिसरे सुपुत्र त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपदही भुषवलं आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख या पदावर आहेत. त्यांच्या पत्नी म्हणजे रश्मी ठाकरे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना असलेली दोन मुलं म्हणजे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे. यापैकी आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. वरळी मतदारसंघाचे आमदार आहेत. तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय नाहीत.

श्रीकांत ठाकरे यांची पुढची पिढी

श्रीकांत ठाकरे यांचा विवाह कुंदा ठाकरेंशी झाला. कुंदा ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे राज ठाकरेंचे वडील. राज ठाकरे यांचा विवाह शर्मिला ठाकरेंशी झाला आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे अशी दोन मुलं आहेत. अमित ठाकरे यांचाही विवाह झाला असून त्यांना कियान नावाचा मुलगा आहे. अमित ठाकरे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उभे राहिले होते. मात्र त्यांना ही निवडणूक जिंकता आली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाच्या चार पिढ्या. (फोटो-दक्षजा धुरी, ग्राफिक्स टीम लोकसत्ता ऑनलाइन)

प्रबोधनकार ठाकरे हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे आजोबा होते. बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंचे काका तर श्रीकांत ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे काका. ठाकरेंच्या पुढच्या पिढीतही काका-पुतण्या परंपरा आहेच. कारण राजकारणात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोघंही सक्रिय आहेत. आदित्य ठाकरे यांचे काका राज ठाकरे तर अमित ठाकरे यांचे काका उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री मीनाताई ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. ठाकरे कुटुंबातले दोन भाऊ म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांपासून वेगळे झाले होते. १९ वर्षांनी मराठीच्या मुद्द्यावर दोघंही भाऊ एकत्र आले आहेत. महापालिकेच्या दृष्टीने ते युती करतात का हे पाहणंही महत्त्वाचं असेल. मात्र ठाकरे कुटुंबाचा प्रभाव गेल्या पाच ते सहा दशकांपासून महाराष्ट्रावर आहे हेच ही सगळी वंशवेल पाहिली की लक्षात येतं.