महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मनसेच्या वतीने नवी मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात प्रलंबित मागण्यासाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “करोनाच्या संपूर्ण कालखंडात सर्व कामगारांनी मदत घेतली. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला नाही, उलट जीवावर उदार होऊन या सगळ्या कामगारांनी काम केलं आहे. याच सर्व आयुक्तांनी त्यावेळच्या प्रशासनाने हे सांगितलं होतं की, ३०० रुपये दिवसाला या प्रमाणे यांना कोविड भत्ता दिला जाईल. मात्र अद्यापही या गोष्टीची पूर्तता करण्यात आलेली नाही. ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये नवी मुंबई महापालिकेच्या मार्फत आणि ५० लाख रुपये शासानाच्या मार्फत देण्याची घोषणा केली होती. अजून पर्यंत त्यांना एकही रुपया मिळालेला नाही.”
तसेच, “करोना काळात जे कायमस्वरूपी कामगार होतो, त्यांच्या खांद्याला खादा लावून कंत्राटी कामगारांनी देखील काम केलय. जेवढा धोका हा कायमस्वरूपी असलेल्या कामगारांना होता तेवढाच कंत्राटी कामगारांना देखील होता. त्यामुळे आमची ही मागणी आहे की ज्याप्रमाणे समान पद्धतीने त्यांनी काम केलं. त्या प्रमाणे त्यांना समान वेतन मिळालं पाहिजे. या तीन प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही आयुक्तांची भेट घेत आहोत.” असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
याचबरोबर, “आज आम्ही आयुक्तांशी चर्चा करू, ठोस आश्वासन त्यांच्याकडून घेऊन येऊ. याची आम्हाला खात्री आहे, नाहीतर मग आम्हाला इथले जे पालकमंत्री आहेत आणि आमची जी माहिती आहे त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी सांगितलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं श्रेय मिळायला नको म्हणून तुम्ही मागण्या मान्य करू नका. जर अशाप्रकारे पालकमंत्र्यांची मानसिकता असेल, तर मला असं वाटतं त्यांच्या मेंदूचा इलाच करावा लागेल आम्हाला आणि तो आमच्या पद्धतीने करू. मग फिरा दाढी खाजवत कुठं फिरतायत ते.” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.