मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याचे ३० लाख पुरावे मिळाल्याची माहिती ही आम्हाला मीडियाकडूनच मिळाली आहे, माझ्याकडे याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. जर अशी माहिती आली तर मी जाहीर करेन असं मनोज जरांगे पाटील यांनी कल्याणमध्ये जाहीर केलं आहे. ज्यांनी आमचं बोगस आरक्षण घेतलं आहे त्यांची संपत्तीही जप्त झाली पाहिजे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. २५ डिसेंबरला आम्ही काय करणार ते इतक्यात सांगणार नाही तो आमचा गनिमी कावा असणार आहे असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

मराठा समाजातल्या प्रत्येकाला हे वाटतं आहे की आपल्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. सामान्य मराठे, शेतकरी, नोकरदार मराठे सगळे सभांना गर्दी करत आहेत. मराठ्यांनी आता ठरवलं आहे की शांततेत संघर्ष करुन मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचा. गनिमी कावा आहे तर आम्ही तो आत्ताच कसा काय सांगणार? असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

ओबीसी नेत्यांकडून जातीय तेढ निर्माण केली जाते आहे

ओबीसी नेत्यांकडून जातीय तेढ निर्माण केली जाते आहे. त्यांचा तसा प्रयत्न आहे आणि तयारीही आहे. मात्र मराठा समाज ते होऊ देणार नाही. शांतता अबाधित ठेवण्याचं काम आम्ही करतो आहोत. त्यांचे विचार त्यांनी जाहीरपणे मांडले आहेत, आम्ही काहीही झालं तरीही तणाव किंवा तेढ निर्माण होऊ देणार नाही. मी आणि माझा मराठा समाज शब्द पाळतो हे सगळ्यांना माहीत आहे. ज्यांनी ज्यांनी आमचं आरक्षण खाल्लं आहे अशा बोगस लोकांची संपत्तीही जप्त व्हावी. ७० वर्षांचं वाटोळं करायला जबाबदार कोण? आरक्षण मिळू द्या सगळा बॅकलॉगही भरुन काढू असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुणीही उग्र आंदोलन करु नका. तसंच एकाही मराठा तरुणाने आत्महत्या करु नये. मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या तर आरक्षण घ्यायचं कुणासाठी आणि द्यायचं कुणाला? एकमेकांना फोन केला की मराठा आरक्षणाची तयारी कशी सुरु आहे हेच विचारा, बाकी चौकशा नंतर करा असंही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सभेत केलं आहे.