Avinash Jadhav Kasheli Tunnel Video: मनसेचे नेते अविनाश जाधव यांना कोकण प्रवासात एक भीषण अनुभव आला आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. अविनाश जाधव यांनी कोकणात आपल्या गावी जात असताना राजापूर तालुक्यातील कशेळी बोगद्याची परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही बोगद्यांमध्ये लाईट नसल्याचे दिसत आहे.
यावेळी अविनाश जाधव यांनी नाशिकच्या इगतपुरी भागात प्रवास करताना तिथे असलेल्या बोगद्यांतील सुविधांची तुलना कोकणातील बोगद्यांशी करून, “हजारो कोटी खर्च करूनही कोकणवासियांच्या जीवाशी खेळ का होतोय?” असा सवाल उपस्थित केला आहे.
या व्हिडिओमध्ये अविनाश जाधव म्हणाले की, “रात्रीचे पावणे बारा वाजले आहेत. मी जिथे उभा आहे, तो हा कशेळीचा बोगदा आहे. हे दोन बोगदे आहेत आणि दोन्ही बोगद्यांमध्ये लाईट नाही. हा कोकण हायवे सुमारे १८ ते २० वर्षांपासून बंद आहे. या दरम्यान कोकणातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोणी हात गमावले तर कोणी पाय. आमच्या कोकणाची जी परिस्थिती, कोकणातील लोकांची परिस्थिती आणि या बोगद्यांची परिस्थिती अतिशय भयावह आहे. जोपर्यंत कोणी मरणार नाही, तोपर्यंत सरकार या गोष्टींकडे लक्ष देणार नाही, असे मला वाटते.”
पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, “मी पक्षाच्या कामासाठी दोन दिवसांपूर्वी इगतपुरीला गेलो होतो. तिकडे मी समृद्धी महामार्गाने गेलो होतो. इगतपुरी ते भिवंडी या मार्गावर दोन मोठे बोगदे आहेत. त्या दोन्ही बोगद्यांना इतक्या मोठ्या लाईट्स लावल्या आहेत की, लोकांना लांबूनच लक्षात येते की बोगदा येणार आहे. याचबरोबर आजूबाजूच्याही सर्व लाईट्स चालू होत्या. त्यामुळे प्रत्येक कोकणवासियाने यावर आवाज उठवला पाहिजे. जर सरकारची कोकणवासियांसोबत अशी वागणूक असेल, तर सरकारचा निषेध आहे.”