नांदेड: एक तपाहून अधिक काळ काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री आणि राज्यातील हरितक्रांतीसह अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचे जनक अशी व्यापक ओळख असलेले बंजारा कुटुंबातील नेते वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत नांदेड येथे उभारलेल्या व काही महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या स्थानिक नेत्यांच्या अट्टाहासातून होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमास अमित शहा यांनी अर्ध्या तासाचा वेळ दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोमवारच्या (दि.२६) नांदेड दौऱ्यांची माहिती पक्षाचे स्थानिक नेते खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे अधिकृतपणे दिल्यानंतर पुतळा अनावरणानंतर भाजपाच्या वरील मान्यवर नेत्यांची पुतळास्थळी भाषणे होणार नसल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व नेते विमानतळावरून थेट नाईक यांच्या पुतळ्याजवळ येऊन अनावरण करणार आहेत. नंतर भाजपाचे राज्यसभा सदस्य डॉ.अजित गोपछडे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी रवाना होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री व अन्य नेत्यांचा नांदेड दौरा बऱ्याच दिवसांपासून पक्षीय कार्यक्रमांसाठीच प्रस्तावित होता. तो पक्षीय कार्यक्रमांसाठीच आखण्यात आला. स्थानिक पातळीवरून नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम नांदेड मनपाच्या माध्यमातून सुचविला गेला. या कार्यक्रमास कमी वेळ दिल्याने बंजारा समाज आणि पुतळा निर्माण समितीत नाराजी होती. ती भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शुक्रवारी चर्चेतून थोपविली.

नाईक यांचा नांदेड शहरात पुतळा व्हावा, यासाठी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास राठोड यांनी १९९७-९८ दरम्यान उपोषण केले होेते. त्या उपोषणाची सांगता करताना तत्कालीन महापौर सुधाकर पांढरे यांनी पुतळा उभारण्यासाठी २५ लाखांची तरतूद मान्य केली होती. नंतरच्या काळात डॉ. बी. डी. चव्हाण व अन्य बंजारा कार्यकर्त्यांनी पुतळ्यासाठी बराच संघर्ष व पाठपुरावा केल्यानंतर काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात या पुतळ्याच्या जागेवर भूमिपूजन करण्यात आले. मनपात काँग्रेसची सत्ता असतानाच या साऱ्या घडामोडी झाल्या होत्या. पण आता त्याचे अनावरण भाजपाच्या केंद्रीय व राज्य नेत्यांच्या हस्ते होत आहे.

शंखनाद सभा

गृहमंत्री अमित शहा व अन्य नेत्यांची पक्षीय व्यासपीठावरील जाहीर सभा सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास नवा मोंढा मैदानावरील बंदिस्त-जलरोधक मंडपामध्ये होणार आहे. त्याचे ‘शंखनाद सभा’ असे नामकरण पक्षाने केले आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्याने दाखविलेले शौर्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची ११ वर्षांची पूर्तता, नक्षलवाद्यांच्या निर्मूलनासाठी केंद्र सरकारने उचललेली कठोर पावले तसेच आगामी काळातील होणाऱ्या निवडणुका इत्यादी बाबींचा शंखनाद होणार असल्याचे चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. सभेला ५० हजारांचा जनसमुदाय उपस्थित राहील, असा दावा त्यांनी केला.

‘शक्तिपीठ’ला विरोध नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गृहमंत्री अमित शहा व अन्य नेत्यांच्या भेटीसंदर्भातील प्रश्न खा.चव्हाण यांनी टोलविला तर बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गासंदर्भात मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे, तीच भाजपाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महामार्गासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही. त्यांचा विरोध मावेजाच्या मुद्द्यावर आहे. त्याबाबत चर्चा घडवून आणली जाईल. त्यातून मार्ग निघेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.