दीपक महाले  

जळगाव : कमी किंवा अवकाळी पाऊस, गुलाबी बोंडअळीसह अन्य किडी व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे राज्यातील कापसाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. शिवाय परदेशातून कापडाची मागणीही घटल्यामुळे राज्यातील निम्मे जिनिंग उद्योग बंद पडले आहेत.

सध्या सूत गिरण्यांकडून कापूस गाठींचा उठाव कमी होत आहे. सरकीचेही भाव कमी झाले आहेत. बांगलादेश, इंडोनेशिया, चीन, व्हिएतनाम या बाजारपेठांतून कापसाला मागणी होत नसल्याने दर कमी झाल्याचे सांगण्यात येते. भारतासह जागतिक उत्पादन, वापर आणि व्यापाराचा अंदाज महिन्याच्या शेवटी येणार असला, तरी सध्या कापसाचा पुरवठा कमी आहे. राज्यात ९०० पेक्षा अधिक, तर जळगाव जिल्ह्यात १५० जिनिंग-प्रेसिंग उद्योग आहेत. कापसाचे उत्पादन घटल्यामुळे आणि शेतकऱ्यांकडून कापूस येत नसल्यामुळे यातील निम्मे उद्योग बंद अवस्थेत आहेत.  मागील हंगामात सुरुवातीला कापसाला प्रतिक्विंटल १० ते १२ हजारांपर्यंत भाव मिळाला. त्यानंतर भाव घसरून ६,५०० रुपयांपर्यंत आले. भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. मात्र, त्यांची आशा फोल ठरली. जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामात कपाशीची पाच लाख ५८ हजार ७८० हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ४० ते ४५ दिवस पिकाला पोषक पाऊस पडला नाही. शिवाय, गुलाबी बोंडअळीसह अन्य किडी व रोगांचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे उत्पादकतेसोबतच गुणवत्तेतही घट झाली आहे.

हेही वाचा >>>शिंदे-फडणवीस यांच्या कार्यकाळातच अदानी कंपनीवर सवलतींची खैरात; शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आरोप

केंद्र सरकारकडून कापसाचा हमीभाव सात हजार २० रुपये ठरविण्यात आला असताना सध्या नव्या कापसाला देशातील बाजारात सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. सर्वच कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत नसून, ओलावा आणि काडी कचरा जास्त असलेल्या कापसासाठी बोली कमी लागत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. चांगल्या प्रतीच्या नव्या कापसाला सरासरी ६,५०० ते ७,००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिका, चीन, ब्राझील येथे बिकट परिस्थिती आहे. यंदा राज्यात कापसाचे उत्पादन ५० ते ६० टक्के घटले आहे. जळगाव जिल्ह्यात १५० जिनिंग उद्योग असून, निम्मे बंदावस्थेत आहेत. जागतिक बाजारपेठेतूनच मागणी होत नसल्याची स्थिती आहे.  – अरविंद जैन, उपाध्यक्ष, खान्देश जिनिंग-प्रेसिंग असोसिएशन