कराड : कोयना धरण पावसाळ्याच्या पहिल्या सत्रातच दोनतृतीयांशहून अधिक भरण्याचा उच्चांक गेल्या दीड- पावणेदोन महिन्यातील पावसाने झाला आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता कोयनेचा जलसाठा ७०.५१ टीएमसी (अब्ज घनफूट , ६६.९९ टक्के) झाला आहे. यंदाचा चांगला पाऊस लक्षात घेता हा जलसाठा ७२ टीएमसीवर पोहोचताच धरणातून विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता कोयनेचा जलसाठा ७०.५१ टीएमसी, अब्ज घनफूट (धरण क्षमतेच्या ६६.९९ टक्के) झाला असून, पाण्याची सलग आवक पाहता काही तासातच हा जलसाठा ७२ टीएमसी होणार आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून कुठल्याही क्षणी पाणी सोडले जाणार आहे. याबाबत बोलताना रासनकर म्हणाले, की कोयनेचा जलसाठा ७२ टीएमसी होताच तो दरवाजाला टेकतो. यंदाचा कोयनेचा जलसाठा अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असल्याने दरवाजातून आतापासूनच विसर्ग करावा लागणार आहे. अशातच वारणा धरणातूनही विसर्ग सुरू असल्याने कृष्णा- नद्यांची पाणीपातळी नियंत्रित राखत जलविसर्ग करण्याचे आव्हान आमच्यासमोर असल्याचे रासनकर यांनी स्पष्ट केले.
कोयना धरणाचा जलसाठा मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ७०.५१ टीएमसी झाला असून, गतवर्षी हाच जलसाठा ३०.२३ टीएमसी (२८.७२ टक्के) राहिला होता. सध्या पश्चिम घाटक्षेत्रात सर्वदूर कमी- अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. दीड- पावणेदोन महिन्यातील सततच्या पावसाने जलाशयांसह नद्यांची पाणीपातळीही लक्षणीय वाढली आहे. सर्वत्र पाण्याचा सुकाळ दिसत असताना खरिपाचा पेरा मात्र आणखी अडचणीत आल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
कोयना पाणलोटात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत ६३ मिमी. एकूण १९७५.६६ मिमी. (वार्षिक सरासरीच्या ३९.५१ टक्के) पाऊस होताना, धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद १९,१८१ घनफूट (क्युसेक) राहिली आहे. कोयना पाणलोटात कोयनानगरला ६३ एकूण २०८९, नवजा ६३ एकूण १,८८३ आणि महाबळेश्वरला ५७ एकूण १,९५५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. हा एकूण पाऊस १९७५.६६ मिमी. (वार्षिक सरासरीच्या ३९.५१ टक्के) असून, गतवर्षी हाच पाऊस १,५०२.३३ मिमी. (वार्षिक सरासरीच्या ३०.०४ टक्के) नोंदला गेला होता.
सातारा तालुक्यातील सांडवली येथे यंदा आजवर सर्वाधिक २,८४४ मिमी. पावसाची नोंद आहे. आज मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणक्षेत्रात दुधगंगेला सर्वाधिक ४० मिमी. खालोखाल वारणा ३३ मिमी, कुंभी २३ मिमी, कोयना २१.६६ मिमी, कडवी १६ मिमी, तारळी १५ मिमी. असा जलाशयांच्या परिसरातील तर, ठोसेघर धबधबा परिसरात ३२ मिमी. पावसाची नोंद आहे. अन्यत्र, निवळे येथे सर्वाधिक ४५ मिमी, पाडळीला ३७ मिमी, सांडवली, जांभूर व रेवाचीवाडी ३२ मिमी, धनगरवाडा येथे ३० मिमी. पाऊस झाला आहे.