अहिल्यानगर : महापालिकेतील तांत्रिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक अडचणींमुळे प्रशासनाने १३० पदांना कात्री लावत केवळ ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला. बिंदू नामावलीसह समांतर आरक्षण निश्चित करून पदभरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी मनपाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे प्रस्ताव सादर केला आहे. मनपातील पद भरतीची प्रक्रिया लगेचच सुरू होण्याची शक्यता आहे.

कर्मचारी आकृतीबंध मंजूर झाल्यापासून आजतागायत मनपात रिक्त पदे भरलेली नाहीत. त्यामुळे विविध अभियंते, विद्युत पर्यवेक्षक अशा तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत चालल्याने कामकाजात अडथळे निर्माण झाले आहेत. महापालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करून परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला होता.

या प्रस्तावाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत १७६ पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर मनपाने १३४ तांत्रिक पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यानच्या काळात सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे महापालिकेच्या आस्थापना खर्चात पुन्हा एकदा वाढ झाली. त्यामुळे महापालिकेने या पदभरतीला कात्री लावत अत्यावश्यक असलेली केवळ ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला.

या पदांच्या सामाजिक आरक्षण निश्चितीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर मनपा स्तरावर समांतर आरक्षण निश्चित करण्यात आले. आता पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी या शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत.

भरली जाणारी पदे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनपात भरली जाणारी ४५ पदे पुढीलप्रमाणे – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १५, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ३, कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) १, अभियांत्रिकी सहाय्यक ८, विद्युत पर्यवेक्षक – ३, लिपीक टंकलेखक १३, संगणक प्रोग्रॅमर १, पशुधन पर्यवेक्षक १.