सांगली : कोयना, चांदोली धरणातून सुरू करण्यात आलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून, सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी मंगळवारी सकाळी १९ फुटांवर पोहचली आहे. सांगलीसह डिग्रज, म्हैसाळ, बहे आणि राजापूर हे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सांगली, मिरज शहरात आज पावसाचा जोर नसला, तरी दिवसभर रिपरिप सुरू होती. तर, मुसळधार पावसाने पाण्याची आवक वाढल्याने चांदोलीचा विसर्ग दोन हजार ५५० क्युसेकने बुधवारपासून वाढविण्यात येत आहे.
चांंदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून, गेल्या २४ तासांत धरण परिसरात ७१ मिमी पाऊस झाला. त्यामुळे धरणात पाण्याची मोठी आवक होत असून, पाण्याची आवक व जावक यामध्ये परिचलन करण्यासाठी विसर्ग करण्यात येत आहे. बुधवारी (९ जुलै) सकाळी १० वाजल्यापासून धरणातील विसर्ग ४५०० क्युसेकवरून सात हजार ५० क्युसेक करण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून मंगळवारी सायंकाळी सांगण्यात आले. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयनेतूनही २ हजार १०० क्युसेक विसर्ग करण्यात येत असून, त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. कोयना व चांदोली धरणातून विसर्ग केला जात असल्याने हरिपूर येथील कृष्णा-वारणा संगमाच्या ठिकाणी पाण्याचे पात्र विस्तारले आहे. वारणा नदीने काही ठिकाणी पात्र सोडले असून, नदीकाठच्या पिकात पाणी शिरले आहे. उद्या आणखी पाण्याचा विसर्ग होणार असून, त्यामुळे आणखी पाणीपातळी वाढणार आहे.
कृष्णा नदीत कोयना धरणातून विसर्ग करण्यात येणारे पाणी आणि ओढे, नाले यांचे पाणी मिसळत असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, मंगळवारी सकाळी आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी १९ फुटांवर पोहचली आहे.