चंद्रावर अलीकडेच पाणी असल्याचे पुरावे मिळाले, पण तिथे जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा पुरावा मात्र अद्याप मिळालेला नाही.. तरीसुद्धा अमेरिकेच्या ‘नॅशनल अ‍ॅरोनॅटिक्स अ‍ॅन्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (नासा) या संस्थेतर्फे पुढच्या वर्षी चंद्रावर वृक्षारोपण केले जाणार आहे. पुण्यासाठी विशेष म्हणजे, या मोहिमेत एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या हेमील मोदी या युवकाला सहभागी होण्याची संधी मिळाली असून, तो त्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
गंमत अशी की हेमील याने आयुष्यात असेच एक स्वप्न पाहिले होते, ते पृथ्वीबाहेर, विश्वात असलेली जीवसृष्टी शोधण्याचे. आता त्याचे स्वप्न वेगळ्या पद्धतीने पूर्ण होत आहे. तो स्वत: चंद्रावर झाडे लावण्याच्या म्हणजेच जीवसृष्टी निर्माण करण्याच्या प्रकल्पात सहभागी झाला आहे. त्याची गेल्या मार्च महिन्यात या प्रकल्पासाठी निवड झाली. हेमीलने ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीमध्ये ‘सिव्हिल इजिनिअरिंग’ची पदवी घेतली. त्यानंतर फ्रान्समध्ये ‘स्पेस इंजिनिअरिंग’ हा दीड वर्षांचा पदव्युत्तर कोर्स पूर्ण केला. हे शिक्षण घेत असतानाच त्याला कार्यानुभव (एन्टर्नशीप) म्हणून २०१२ मध्ये ‘नासा’मध्ये काम करता आले. यावेळी त्याची कामगिरी चमकदार असल्याने त्याची ‘नासा’मध्ये ‘रीसर्च सायन्टिस्ट’ म्हणून निवड झाली. ‘नासा’तर्फे चंद्रावर झाडे लावण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यात सहभागी होण्याची संधी हेमील याला मिळाली आहे.
प्रयोग व त्याची प्रतिकृती
नासामध्ये चंद्रावर झाडे लावण्याचा प्रकल्प २०१५ मध्ये होणार आहे. या प्रकल्पावर सध्या काम सुरू असून, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे तयारी केली जात आहे. चंद्रावर झाड लावण्यात येईल, त्याच वेळी जगातील निवडक शाळांना एक कीट दिले जाणार आहे. त्यात चंद्रावर लावल्या जाणाऱ्या झाडाच्या भोवतीचे वातावरण (प्लास्टिकमध्ये) तयार करून दिले जाणार आहे. त्यात रोप असेल. त्यामुळे मुलांना पृथ्वीवर असूनही चंद्रावर झाडाची वाढ कशी होते, हे समजणार आहे. नासामध्ये केल्या जाणाऱ्या प्रयोगापैकी पृथ्वी आणि चंद्र असा एकाच वेळी केला जाणार हा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.
शिक्षकांच्या मदतीमुळे..‘नासामध्ये काम करण्याचे दहावीपासूनच माझे स्वप्न होते. मला धरतीच्या बाहेरचे जीवन शोधायचे होते. त्यानुसार मी वेगवेगळ्या प्रकारे तयारीही सुरू केली होती. पदवीचे शिक्षण घेतानाच हे स्वप्न माझे शिक्षक व प्राचार्य शिवाजी महाडकर यांना सांगितले होते. त्यानंतर शिक्षक व प्राचार्याची मोठी मदत झाली. मी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा विद्यार्थी आहे. त्यांची पहिली भेट २००५ मध्ये घेतली व त्यांनाही माझे स्वप्न सांगितले. त्यानंतर डॉ. कलाम यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. ‘नासा’मध्ये सहभागी झाल्यावर वेगळीच ऊर्जा मिळते. तिथे तुमचे शिक्षण, देश, रंग किंवा भाषा पाहिली जात नाही. तिथे फक्त ध्येय आणि मानवतेसाठी तुम्ही काय करू शकता हे पाहिले जाते.’’ हेमील मोदी