नांदेड : भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आगामी नांदेड दौऱ्यातील पक्षप्रवेशासाठी नांदेडपासून परभणी, जालन्यापर्यंत जाळे फेकण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका माजी आमदाराच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे; पण भाजपाच्या वाटेवर समजले जाणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम बुधवारी पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास हजर असल्याचे दिसले.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या येत्या २६ तारखेच्या नांदेड दौर्याची खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारी चाललेली असताना या दौर्यातील एका मोठ्या कार्यक्रमात काँग्रेसचे मराठवाड्यातील काही माजी आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचे निकटवर्ती, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्याकडे आज थेट विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मला भाजपाचे उपरणे घालण्यात आले होते. त्यानंतर आता जाहीर प्रवेश करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परभणी आणि जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे दोन माजी आमदार अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेऊ शकतात, अशी चर्चा येथे होत आहे.

संभाव्य नावांमध्ये कंधारचे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांचेही नाव घेण्यात येत आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता भाजपा प्रवेशासंदर्भात आपल्याकडे कोणी संपर्क साधला नाही आणि आता पक्ष बदलण्याचाही विषय नाही, असे त्यांनी सांगितले.

खासदार चव्हाण यांनी गेल्या सोमवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी प्रदीर्घ कालावधीनंतर सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर कदम यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या. त्यावर त्यांनी कुठलाही खुलासा नंतर केला नाही. पण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी सकाळी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या अभिवादन सभेस कदम उपस्थित होते. पक्षाच्या नियोजित कार्यक्रमविषयक चर्चेमध्ये त्यांनी भागही घेतल्याचे सांगण्यात आले.

भाजपात बैठकांचा धडाका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने खा.अशोक चव्हाण यांनी मागील दोन दिवसांपासून वेगवेगळ्या बैठकांचा धडाका सुरू केला आहे. मंगळवारी दुपारी त्यांनी उत्तर जिल्हा भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेतली. बुधवारी दुपारी शंकरस्मृती इमारतीतील सभागृहामध्येही एक व्यापक बैठक घेण्यात आल्याचे दिसून आले. अमित शहा यांच्या नियोजित दौऱ्यातील कार्यक्रमांचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नाही. पण या दौऱ्यात ते खासदार चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.