Sharad Pawar On Ajit Pawar NCP : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चांमागचं कारण म्हणजे खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही दिवसांपूर्वी एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भात काही नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
असं असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (३०) मे रोजी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र येण्यावरून मतभेद असल्याचा दावा केला होता. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन मोठ्या नेत्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर एकत्र येण्यास विरोध असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर आल्या आणि हा दावा फेटाळण्यात आला.
दरम्यान, यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याचवेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर शरद पवार यांनी फक्त तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली.
शरद पवार काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी) काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला असता शरद पवार म्हणाले की, “मला माहिती नाही”, असं म्हणत त्यांनी फक्त तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली.