लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली: सांगलीतील शामरावनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची अफवा पसरताच मंगळवारी रात्री नागरिकांची घाबरगुंडी उडाली. वन विभाग व प्राणी मित्रांनी याचा तातडीने शोध घेतला असता सदरचा प्राणी तरस असल्याचे स्पष्ट झाले.
रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना शामरावनगरमध्ये वन्यप्राणी आढळला. हाच प्राणी तक्षशिला रोड, उष:काल हॉस्पिटल परिसरात आढळला. मात्र अंधारामुळे नेमका प्राणी कोणता आहे हे स्पष्ट दिसले नाही. यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची अफवा समाज माध्यमावरुन पसरली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
हेही वाचा… सांगली: जतसाठी केंद्राकडून २५ कोटींचा निधी
वन कर्मचारी, मानद वन्यजीवरक्षक अजित पाटील व प्राणीमित्रांनी शोध सुरु केला. विजेरीच्या व पथदिव्यांच्या प्रकाशात हा वन्यप्राणी तरस असल्याचे दिसून आले. हा तरस रात्री साडेअकरा वाजता कोल्हापूर रस्ता ओलांडून हरिपूरच्या हद्दीत गेला आहे. वन्यप्राणी आढळल्यास काय दक्षता घ्यावी याची माहिती वन विभागाकडून ध्वनीक्षेपकातून या परिसरातील नागरिकांना दिली.