सोलापूर : सांगोला तालुक्यातील हातीद गावच्या शिवारात गरिबीतून काबाडकष्ट करून एका एकरात फुलवलेल्या डाळिंबाच्या बागेतून चोरट्याने तीन टन डाळिंब रातोरात चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे डाळिंबाच्या बागेत शेतकऱ्याला जाता आले नाही. त्यामुळे चोरट्याने डाव साधला.
अल्ताफ पापा मुल्ला (वय ३९) यांनी याबाबत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी कर्ज काढून एक एकरात भगवा जातीच्या दर्जेदार डाळिंबाची लागवड केली होती. अहोरात्र कष्ट करून बागेची निगा राखल्यानंतर डाळिंब परिपक्व होऊन काढणीला आले होते. अलीकडे दररोज रात्री मुल्ला दाम्पत्य व त्यांचा मुलगा डाळिंबाच्या बागेत झोपायला जात होते. परंतु रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे त्यांना बागेत जाता आले नाही. त्यामुळे चोरट्याने डाव साधत बागेतील ३०० झाडांवर लटकलेले डाळिंब काढून नेले. बाजारभावाप्रमाणे काढणीला आलेल्या या डाळिंबाची किंमत सुमारे साडेतीन लाखांपर्यंत होती. दोन दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याने मुल्ला यांच्याशी संपर्क साधून प्रतिकिलो १३० रुपये दराने डाळिंब खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, प्रति किलो १५० रुपये दराने डाळिंब देऊ, असे मुल्ला यांचे म्हणणे होते.
यातच आपल्या बागेतील तीन टन डाळिंबाची चोरी झाल्याने मुल्ला कुटुंबीयांना धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वी मरण पावलेल्या भावाचा मुलगा आणि स्वतःच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च आणि उदरनिर्वाहासाठी मुल्ला हे बागेतून येणाऱ्या उत्पन्नावर आस ठेवून होते. परंतु ‘एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले’ अशी व्यथा अल्ताफ मुल्ला यांनी बोलून दाखविली.
दरम्यान, सध्या डाळिंबकाढणीला वेग आला असून, बाजारपेठेत डाळिंबाची आवक वाढली आहे. दर्जेदार भगव्या जातीच्या डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे. चोरीला गेलेल्या तीन टन डाळिंबाची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये अपेक्षित असताना पोलिसांनी त्यांचे मूल्य साठ हजार रुपये इतके दर्शविल्याचे मुल्ला यांनी सांगितले.