सोलापूर : रब्बी पीक हंगामासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा लांबलेल्या पावसाचा परिणाम पीक पेरण्यांवर झाला आहे. मात्र दुसरीकडे मका लागवड मोठ्या जोमदारपणे झाली आहे. विशेषतः मंगळवेढा आणि सांगोल्यासह माढा, पंढरपूर, मोहोळ या भागात मक्याचा पेरा जास्त प्रमाणात झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने ज्वारीचे पीक घेतले जाते. परंतु यंदा रब्बी हंगामात पाऊस लांबल्यामुळे ज्वारीची लागवड सरासरी क्षेत्रापेक्षा खूपच कमी प्रमाणात झाली आहे. तर याउलट मक्याची पेरणी सरासरी क्षेत्राच्या १४१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. अलीकडे काही वर्षांपासून जिल्ह्यात मका पेरणीला शेतकरी पसंती देत आहेत. जिल्ह्यात मका लागवडीचे सरासरी क्षेत्र ३६ हजार ४९६ हेक्टर एवढे आहे. मागील वर्षी रब्बी हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त म्हणजे ४७ हजार ६४६ क्षेत्रात (१३०.५६ टक्के) मक्याची लागवड झाली होती. यंदाच्या हंगामात त्याहून जास्त म्हणजे ५१ हजार ३१३ हेक्टर क्षेत्रात १४०.६१ टक्के) मक्याचा पेरा झाला आहे.

हेही वाचा – मंत्र्यांची संख्या, खात्यांवरून घोळ; रखडलेला शपथविधी उद्या नागपूरमध्ये?

मागील वर्षीच्या हंगामात सांगोला तालुक्यात १२ हजार ९३६ हेक्टर क्षेत्रात (२५०.८९ टक्के) मक्याची पेरणी झाली होती. तर यंदा त्यात ८ टक्क्यांनी वाढ झाली असून सरासरी ५१५६ हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त म्हणजे १३ हजार ३२१ क्षेत्रात (२५८.३६ टक्के) शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली आहे. मंगळवेढ्यातही २९४ टक्के म्हणजे ६४६५ हेक्टर क्षेत्रात मक्याची उगवण होत आहे. करमाळ्यात ४१५६ हेक्टर क्षेत्र (१८५ टक्के), माढा तालुक्यात ६३२१ हेक्टर क्षेत्र (१७७.८६ टक्के), पंढरपुरात ४१५६ हेक्टर क्षेत्र (१२३.७६ टक्के), मोहोळ तालुक्यात ४३६७ हेक्टर क्षेत्र (११०.६७ टक्के) याप्रमाणे मक्याची लागवड झाली आहे. या तुलनेत अक्कलकोट (२७.७६ टक्के), बार्शी (४२ टक्के), दक्षिण सोलापूर (४३ टक्के) या भागात मक्याची लागवड बेताची झाल्याचे दिसून येते.

हेही वाचा – विकासासाठी धोरणांची अंमलबजावणी; एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मक्याचे क्षेत्र का वाढले ?

अन्य पिकांच्या तुलनेत मक्याचा वधारलेला भाव, त्यापासून जनावरांसाठी उपलब्ध होणार हिरवा चारा आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरतो. मक्याच्या हिरव्या चाऱ्याला पशुखाद्य कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळेच मक्याचा पेरा वाढल्याचे बोलले जाते.