मोहनीराज लहाडे
नगर : जिल्ह्यात यंदाच्या गाळप हंगामात ८० ते ९० हजार मे. टन अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरिक्त उसामुळे जिल्ह्यातील काही कारखान्यांचे गाळप हंगाम मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत लांबणार आहेत. कारखान्यांकडील ऊस तोडणी मजुरांच्या टोळय़ा कडाक्याच्या उन्हामुळेही लवकर परतू लागल्या आहेत. ‘हार्वेस्टर’ मालकांना ऑपरेटरची समस्याही जाणवू लागली आहे. लांबलेल्या गाळप हंगामामुळे तोडणीचा दर वाढवण्याची मागणी केली जात आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न प्रामुख्याने श्रीरामपूरमध्ये, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘अशोक’च्या कार्यक्षेत्रातील अतिरक्त उसाचे विखे कारखाना (राहाता) ३० हजार मे. टन, थोरात (संगमनेर) व ज्ञानेश्वर (नेवासे) २५ हजार मे. टन. मार्फत गाळप केले जाणार आहे. मात्र या उसाची तोडणी ‘अशोक’ मार्फत केली जाणार आहे. तसा प्रस्ताव नगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयामार्फत साखर आयुक्तांना पाठवला जाणार आहे. मात्र यासाठी अशोक कारखाना जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत चालवावा लागणार आहे. याशिवाय जिल्ह्यात जे कारखाने बंद झाले आहेत तेथील हार्वेस्टर, वाहन चालकांशी संपर्क साधून त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी ‘अशोक’च्या व्यवस्थापनावर टाकण्यात आली. या संदर्भातील समन्वय प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
अतिरिक्त ऊस गाळपाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या बैठकीची सूचना केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १७ ते १८ कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक व शेती अधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीतच ‘अशोक’ च्या कार्यक्षेत्रातील उसाचे विखे, थोरात व ज्ञानेश्वर साखर कारखान्यामार्फत गाळप करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेली दोन वर्ष जिल्ह्यात वेळेवर व समाधानकारक पाऊस झाला. धरणातील पाणी साठेही समाधानकारक होते. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली. यंदाच्या गाळपासाठी २ लाख ६४ हजार ७३३ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध होता. एकूण १ कोटी ८५ लाख ६० हजार ५१६ मे. टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. आत्तापर्यंत १ कोटी ७३ लाख ३० हजार १३ मे. टन गाळप झाले आहे. एकाच कार्यक्षेत्रातील उसाची दुबार नोंदणी, गुऱ्हाळ, रसवंतिगृह, चारा व अन्य प्रकारची घट यासाठी यामुळे १० टक्के ऊस कारखान्याकडे जात नाही. त्यामुळे सुमारे आत्तापर्यंत ९.५० लाख मे. टन ऊस शिल्लक आहे. दिल्ली जिल्ह्यात उसाचे सर्वसाधारण क्षेत्र असल्यास १६० ते १८० दिवस गाळप हंगाम चालतो. नोव्हेंबरमध्ये गाळपास सुरुवात झाली. वाढत्या उन्हामुळे ऊसतोडणी मजुरांच्या टोळय़ा लवकर परतू लागल्या आहेत. हार्वेस्टर चालकांना ऑपरेटरची समस्या जाणवत आहे. त्याचबरोबर ऊस भरण्यासाठी वाहनांची उपलब्धताही अडचणीची झाली आहे. ‘आरटीओ’कडूनही अडवणूक सुरू आहे. चालकांनी वाहतूक दर वाढवून मागितला असल्याचे समजते. वेळेत हार्वेस्टर उपलब्ध करण्यासाठी, जे कारखाने बंद झाले आहेत तेथील हार्वेस्टर ‘अशोक’च्या व्यवस्थापनाला उपलब्ध करावे लागणार आहेत. इतर बहुतांश कारखाने त्यांच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस असला तरी गाळप करणार आहेत. मात्र अशोकह्णची क्षमता ४ हजार मे. टन असल्यामुळे अतिरिक्त उसाच्या गाळपाचे आव्हान निर्माण झाले आहे.
२३ पैकी ९ कारखान्यांचे गाळप बंद
जिल्ह्यात १४ सहकारी व ९ खासगी असे एकूण २३ कारखाने आहेत. त्यातील क्रांती शुगर, जय श्रीराम, साजन शुगर व राहुरी असे ४ कारखाने बंद झाले आहेत. कुकडी, नागवडे, पीयूष, अंबालिका, युटेक असे ५ कारखाने आज किंवा उद्या बंद होत आहेत. जिल्ह्यात श्रीरामपूरसह नेवासा, राहता, कोपरगाव, संगमनेर, पाथर्डी व शेवगाव तालुक्यात अतिरिक्त ऊस आहे. त्यामुळे अगस्ती २० मे, अशोक जूनचा पहिला आठवडा, विखे ज्ञानेश्वर, गणेश, थोरात, प्रसाद शुगर, केदारेश्वर ३१ मे पर्यंत, मुळा, वृद्धेश्वर, गंगामाई २५ मे, काळे, संजीवनी, ६ जूनपर्यंत चालवले जातील. या नियोजनात काहीसा बदलही होऊ शकतो.

१ मेनंतरच्या गाळपासाठी अनुदान
अतिरिक्त उसाचे गाळप केल्यास ५० किमीपेक्षा जास्त वाहतूक केल्यास प्रति किमी. ५ रुपये वाहतूक अनुदान, तर साखर उतारा घट १० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास २०० रुपये प्रति टन अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र हे अनुदान १ मेनंतरच्या गाळपासाठी मिळणार आहे. उसाची वाहतूक ५० किमीच्या आतमध्ये असल्यास अनुदान मिळणार नाही.