अकोला : भक्तांच्या हाकेला धावणारी बाळापूरचे आराध्यदैवत स्वयंभू श्री बाळादेवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात पंचक्रोशीसह विदर्भातून हजारो भाविकांची गर्दी उसळत आहे. बाळापूर शहराला श्री बाळादेवीच्या नावामुळेच ओळख मिळाली. हे मंदिर पुरातन व ऐतिहासिक असून हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अनेक प्राचीन वास्तू बाळापूर शहरात असून समृद्ध इतिहासाची ते साक्ष देतात. बाळापूर शहरातील मन आणि म्हस नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी उंच टेकडीवर बाळादेवीचे सुंदर व सुबक मंदिर अस्तित्वात आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात बाळादेवी मातेचा सुंदर असा मुखवटा अर्थातच विग्रह बसवलेला आहे. मुखवट्यावर दोनवेळा सुर्याची थेट किरणे पडतात.

मंदिरात स्वयंभू देवी असून भाविकांची मोठी श्रद्धा आहे. बाळादेवीचे हे मंदिर मुळात त्रिपुर सुंदरीचे पीठ आहे. ‘श्रीयंत्रा’ची जी महती सांगितली जाते, त्यामध्ये श्रीयंत्राची देवता ही ‘बाळात्रिपुरसुंदरी’ आहे. श्रीयंत्राची उपासना करणे म्हणजेचं ‘त्रिपुरसुंदरीची उपासना’ आहे. अठरा पुराणातल्या ब्रम्हांड पुराणात ‘ललिता पाठ्यायन’ आहे. त्यामध्ये ‘बाविसाव्या अध्यायात’ बाळादेवीने ‘भंडासुर’ नामक दैत्य व त्याच्या तीस पुत्रांशी पराक्रमी संघर्ष करुन त्यांचा वध केल्याची महती वर्णन केली आहे. ‘आगम ग्रंथात’ बाळासहस्त्रनाम, श्री बाळा अष्टोत्तर शतनाम, श्री बाळाकवच, श्री बाळामकरंद स्तवन अशा स्तोत्रांचा उल्लेख आहे.

बाळापूर येथील बाळादेवीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी ५५ पायऱ्या आहेत. पूर्वी हे मंदिर लाकडांच्या खांबावर उभे होते. ७० च्या दशकामध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. गेल्या काही वर्षांमध्ये देखील विविध विकास कार्य करण्यात आले आहे. सध्या नवरात्रोत्सव असल्याने बाळादेवी मंदिरात यात्रेचे स्वरुप आले आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण

नवरात्रोत्सवानिमित्त बाळापूर येथील श्रीबाळादेवी मातेच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. गडावरील धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भजन, कीर्तन, गोंधळ होत आहेत. देवीची महापूजा आणि महाभिषेक करण्यात येतो. भाविक भक्त अतिशय श्रद्धेने धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

विजयादशमीला सीमोल्लंघन

नवरात्रोत्सवामध्ये विजयादशमीला पालखी काढली जाते. शहराच्या प्रमुख मार्गावरून राजवैभवी थाटात पालकी मार्गक्रमण करून सीमोल्लंघन केले जाते. बाळापूरमध्ये सीमोल्लंघनाची देखील मोठी परंपरा आहे. हा उत्सव पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते.