सोलापूर : उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेचे काम सुरू करताना हैदराबादच्या ‘पोचमपाड कन्ट्रक्शन’ कंपनीचा ढिसाळ कारभार पुन्हा उजेडात आला आहे. योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश मिळण्यापूर्वीच मक्तेदार कंपनीने उजनी धरणाजवळ पंपगृहाचे काम सुरू करताना चक्क प्रचंड शक्तिशाली स्फोटकांचा वापर केल्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. ही गंभीर बाब लक्षात येताच जलससंपदा विभागाने तत्काळ हस्तक्षेप करून काम रोखले आहे. 

सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीमार्फत हाती घेण्यात आलेल्या उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेशी संबंधित पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनी सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे.  राजकीय वजन वापरून ‘पोचमपाड कन्स्ट्रक्शन’ कंपनीने उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेचे सुमारे ६६७ कोटी ८७ लाख रुपये खर्चाचे काम मिळाल्यानंतर पुन्हा ढिसाळ कारभाराचे दर्शन घडविले आहे. रीतसर कार्यारंभ आदेश हातात पडण्यापूर्वीच कंपनीने उजनी धरणाजवळ पंपगृहासाठी खोदकाम सुरू करताना प्रचंड शक्तिशाली स्फोटकांचा वापर केल्याचे दिसून आले. त्यावर आक्षेप घेत जलसंपदा विभागाने मक्तेदार कंपनीच्या प्रतिनिधीला स्फोटकांचा वापर न करण्याबाबत तीव्र शब्दात जाणीव करून दिली होती. परंतु तरीही नंतर सलग दोन दिवस शक्तिशाली स्फोटकांचा वापर करून पंपगृहाचे काम केले गेले. तेव्हा उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी स्वत: उजनी धरण परिसरात संबंधित कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर हे काम तातडीने थांबविण्यासाठी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला लेखी सूचना दिल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या ७५० मीटर परिसरात स्फोट घडविण्यास सक्त मनाई आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उजनी धरण परिसरात खोदकामासाठी स्फोटकांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. स्फोटकांऐवजी ब्रेकरचा वापर करता येऊ शकतो. परंतु उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेसाठी नियम-अटींचे उल्लंघन करून शक्तिशाली स्फोटकांचा वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे काम तात्काळ थांबविण्यात आले आहे. तसे पत्र कार्यकारी अभियंत्याने सोलापूर सिटी डेव्हलेपमेंट का?र्पोरेशन कंपनीला दिले आहे. तरीही पुन्हा नियमांचे उल्लंघन करून स्फोटकांचा वापर झाल्यास संबधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. -धीरज साळे, अधीक्षक अभियंता, उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण