लोकसत्ता वार्ताहर
नांदेड: गणेश विसर्जनाच्या दिवशी शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर बिलोली तालुक्यातील बामणी या गावावर शोककळा पसरली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.




बामणी गावाशेजारील शेततळ्यात सार्वजनिक गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर गणपती पाण्याच्यावर आल्याचे कोणीतरी सांगितल्यानंतर गावातील चार मुले शेततळ्याकडे गेले. तेथे गेल्यावर ते पोहण्यासाठी तळ्यात उतरले. पण नंतर त्यातील तिघेजणं पाण्यात बुडाले.
हेही वाचा… “दिवाळीनंतर देशात कत्तल की रात…”, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
या चौघांमधील एक मुलगा मात्र तळ्याच्या बाहेर होता. आपले मित्र पाण्यात बुडत असल्याचे पाहून ही बाब त्याने गावात कळविली. पण ग्रामस्थ मदतीला येईपर्यंत देवानंद (वय १२) व पिराजी (वय ९) हे गायकवाड बंधू पाण्यात बुडाले होते. त्यांच्यासोबत वैभव दुधारे (वय १३) हाही बुडून मरण पावला. या घटनेनंतर बिलोली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एका छोट्याशा गावातील तिघांना अचानक जलसमाधी मिळाल्यावर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.