लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यासह शेजारच्या धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर रामलिंग अभयारण्य व आसपासच्या गावांमध्ये जनावरांची मोठ्या प्रमाणावर शिकार करून दहशत बसविलेल्या वाघाचा महिना उलटून गेला तरी अद्याप शोध लागला नाही. वनविभागाच्या चंद्रपूर येथील शीघ्र बचाव पथकाने मागील आठवड्यापासून वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरू केली असली तरी दुसरीकडे वाघाकडून जनावरांवरील हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. वन विभागानेही वाघाच्या शोध मोहिमेबाबत कमालीची गुप्तता पाळल्यामुळे या शोध मोहिमेचे नेमके काय चालले आहे, हे स्पष्ट होत नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर व्याघ्र अभयारण्यातून तब्बल ५०० किलोमीटर अंतर दूर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व धाराशिवच्या येडशी भागात भटकत आलेला वाघ गेल्या ३६ दिवसांपासून दहशत माजवत आहे. दुसरीकडे बिबट्यांनीही गेल्या अनेक दिवसांपासून बार्शी भागातच नव्हे, तर करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर धुमाकूळ घातला आहे. बिबट्यांचे दररोज कोठे ना कोठे दर्शन घडत आहे. सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागात बाळे परिसरासह नजीकच्या मार्डी व अन्य गावांच्या शिवारातही बिबट्यांचा वावर वाढला आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्याचा विषय वन विभागांच्या पटलावर अद्याप आला नाही. दोन वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घालून जनावरांबरोबरच चार माणसांचेही बळी घेतले होते. तेव्हा अखेर त्या नरभक्षक वाघाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.

आणखी वाचा-कराड: मरगळलेल्या मोराची पाहुणचार; उपचार घेऊन पुन्हा आकाशी झेप

या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांचा उपद्रव पुन्हा वाढला आहे. जिल्ह्यात सध्या नेमका किती बिबट्यांचा वावर आहे, यांची माहिती वन खात्याकडून उघड होत नाही. या पार्श्वभूमीवर बिबट्यांपाठोपाठ आता बार्शी परिसरात वाघानेही मागील ३६ दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. बार्शी तालुक्यात चाले, उक्कडगाव, नारी, कारी, ढेंबरेवाडी, राळेरास, लाडोळे, मुंगशी, सासुरे, वैराग आदी गावांच्या शिवारात वाघाने आतापर्यंत २५ पेक्षा अधिक गायी, म्हशी, शेळ्या, वासरे शिकार करून फस्त केली आहेत.

वाघाचे वास्तव असलेल्या आकाराने छोटा असलेला रामलिंग अभयारण्य आहे. चंद्रपूर येथील शीघ्र बचाव पथकाने मागील आठवड्यापासून बार्शी व येडशी परिसरात वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहीम चालविली आहे. निष्णात आणि तज्ज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या बचाव पथकात ५० पेक्षा अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे. वाघाचा ठावठिकाणा लागण्यासाठी पावलांचे ठसे शोधून वाघाचा माग काढला जात आहे. एकीकडे पावलांचे ठसे शोधले जात असताना दुसरीकडे प्रत्यक्ष वाघ आसपासच्या काही गावांमध्ये नागरी वस्त्यांजवळ जनावरांची शिकार करीत आहे. दररोज २० ते २५ किलोमीटर परिसर शीघ्र बचाव पथक वाघाच्या शोधात भटकत आहे. पायाचे ठसे काही भागात सापडतात. ठिकठिकाणी लावलेल्या सापळा कॅमेऱ्यामध्ये वाघाची छबी कैद होते. परंतु त्याचवेळी वाघ शीघ्र बचाव पथकाला गुंगारा देऊन जनावरांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आणखी वाढले आहे.

आणखी वाचा-वन पर्यटनात नियम मोडल्यास २५ हजारांपर्यंतचा दंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इकडे वाघाला जेरबंद करण्यासाठी शीघ्र बचाव पथकाला अद्याप नेमकी दिशा सापडली नसताना वन खात्याकडून या शोध मोहिमेबाबत गुप्तता पाळली जात आहे. सोलापुरातील मुख्य वनसंरक्षक कुशाग्र पाठक यांच्याशी अधून मधून संपर्क साधला असता त्यांच्याकडून शोध चालू आहे, वाघ पकडला गेला तर लगेचच माहिती देऊ, असे साचेबद्ध उत्तर दिले जाते. त्यामुळे बार्शी परिसरातील वाघाच्या दहशतीखाली असलेल्या गावांतील भय अजून संपलेले नाही.