टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. विक्रीस आणलेल्या मालातून उत्पादन व वाहतूक खर्चदेखील निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणलेला माल आवारात फेकून देत आपला रोष व्यक्त केला. पतसंस्था व बँकामधून कर्ज घेऊन मोठ्या संख्येने विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोला बाजारपेठेत अत्यंत कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

इगतपुरीत जलसाठा मुबलक असल्याने बागायती पीके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणाहून कर्ज घेत महागडी बियाणे, औषधे, खते घेऊन टोमॅटोची लागवड केली. या महिन्यात मोठया प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी तयार झाले असल्याने, घोटी बाजार समितीत विक्रीसाठी आणले गेले. परंतु टोमॅटोला अल्प भाव मिळत असून ग्राहकच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव हा माल जमिनीवर फेकून दिला.

टोमॅटो लागवडीपासून ते विक्रीपर्यंत एका जाळीला शंभर रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. तुलनेत टोमॅटोच्या एका जाळीला अवघा दहा ते वीस रुपयांचा भाव मिळत असल्याने तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.