करोना नियंत्रणासाठी ‘ट्रेस,टेस्टींग आणि ट्रिटमेंट’ हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविणार असल्याचे मत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर जिल्ह्याचे ३१ वे जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाने यांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पदभार स्विकारला. रूजू होताच त्यांनी करोना आढावा बैठक घेतली. बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रू. वायाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सूरपाम उपस्थित होते.

सर्वप्रथम जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी करोनाच्या स्थितीची माहिती घेतली व त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. २०१० च्या तुकडीचे सनदी अधिकारी असणारे अजय गुल्हाने यांनी यापूर्वी लोकसभा, विधानसभा व विधान परिषद निवडणूक काळात यवतमाळ येथे एक वर्ष जिल्हाधिकारी म्हणून कार्य केले आहे. आज रुजू झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील विभाग प्रमुखांची बैठक घेऊन करोना संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या.

आरोग्य यंत्रणेसोबत देखील त्यांनी चर्चा केली. एमएसस्सी हॉर्टीकल्चर हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले गुल्हाने यांनी १९९४ मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावरून आपल्या प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला. उपविभागीय अधिकारी हिंगणघाट, जिल्हा वर्धा. उपविभागीय अधिकारी वर्धा, उपजिल्हाधिकारी महसूल नागपूर, नगर दंडाधिकारी नागपूर, अतिरिक्त जिल्हाधिकारी नांदेड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना अभियान, ऊर्जामंत्री यांचे स्वीय सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तर मुंबई येथे जलस्वराज्यचे प्रकल्प संचालक म्हणून मुंबई येथे ते कार्यरत होते. प्रशासनातील उत्तम कार्यासाठी त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उत्कृष्ट अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.

नवी दिल्ली येथून दिला जाणारा प्रतिष्ठीत स्कॉच अवॉर्ड ऑफ एक्सलन्स, स्कॉच अवार्ड ऑफ मेरीट त्यांना प्रशासनातील योगदानासाठी मिळाला आहे. याशिवाय ई -गव्हर्नन्समध्ये राज्य शासनाकडून देखील त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट जलतरणपटू व धावपटू म्हणूनही महाविद्यालयीन जीवनात प्राविण्य प्राप्त आहेत. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्विकारताच त्यांनी करोना नियंत्रणाच्या कार्याला सुरूवात केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trace testing and treatment for corona control to be implemented in chandrapur district msr
First published on: 12-08-2020 at 18:37 IST