कराड : गुहागर- विजापूर महामार्गावरील पाटण ते कोयनानगर दरम्यान, वाजेगाव (ता. पाटण) येथील पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे ठप्प झालेली आणि अन्य मार्गाने वळवण्यात आलेली वाहतूक दोन दिवसांनंतर पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे ऐन पावसात वाहनधारक, प्रवाशी व स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला असून, संबंधित यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सध्या या रस्त्यावरून लहान वाहनांची निर्धोक वाहतूक सुरू आहे. मात्र, खबरदारी घेवून ठरावीक अंतराने अवजड वाहने या मार्गावरून सोडण्यात येत आहेत.
कोयना खोऱ्यात सलग कोसळत असलेल्या जोरदार पावसाने वाजेगाव येथील पर्यायी रस्ता वाहून गेला. त्यामुळे पाटण- संगमनगर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. ही बाब अतिशय गांभीर्याने घेवून पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता महेश पाटील यांनी कामाची आखणी करून हा मार्ग अल्पावधीत पुन्हा सुरू केला आहे. या मार्गावरील पर्यायी रस्ता व पुलाची भरपावसात युद्धपातळीवर डागडुजी झाल्यानंतर संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीने पाहणी केली.
प्रत्यक्ष वाहतूक करून चाचणी घेण्यात आली. मात्र, अवजड वाहनांमुळे काही ठिकाणी रस्ता खचू लागल्याने पुन्हा काहीकाळ वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर खचलेल्या जागा भरून काढत पुन्हा वाहने सोडण्यात आली. संपूर्ण डागडुजी केल्यानंतर आणि अंतराने एक- एक वाहन सोडण्यात आले. दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस कमालीची दक्षता घेतली जाणार असून, वाहनचालकांनीही या मार्गावरून ये-जा करताना, सावधानता बाळगावी, असे आवाहन महामार्ग विभागाचे उपअभियंता महेश पाटील यांनी केले आहे.