Pooja Khedkar: वादग्रस्त सनदी अधिकारी अशी ओळख झालेल्या पूजा खेडकर यांनी आता एक सवाल केला आहे. त्यांनी हा विचारलेला हा प्रश्नही चर्चेत आहे. पूजा खेडकर यांनी ट्रेनी सनदी अधिकारी असूनही त्यांनी स्वतःसाठी केबीन मागितलं, तसंच खासगी कारवर अंबर दिवा लावला. एवढंच नाही दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्न जास्त असतानाही नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्रामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या सगळ्याची दखल केंद्रानेही घेतली आहे. माध्यमांनी त्यांना गाठल्यानंतर मी तुमच्यासमोर बोलू शकत नाही असं त्या म्हणाल्या होत्या. आता त्यांनी माध्यमांनाच सवाल केला आहे.

पूजा खेडकर यांचे कारनामे

पूजा खेडकर प्रोबेशन कालावधीतही असतानाही अधिकारी असल्याच्या थाटात राहात होत्या. त्यांच्या सगळ्या थाटाच्या सुरस कथा आता समोर येत आहेत. नियम असं सांगतो की खासगी कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावणं योग्य नाही. मात्र पूजा खेडकर यांनी त्यांच्या ऑडी कारवर महाराष्ट्र शासन असं स्टिकर लावलं होतं. तसंच खासगी कारला लाल आणि निळा दिवाही लावता येत नाही. तो दिवाही त्यांनी त्यांच्या ऑडी कारला लावला होता. खासगी कारला लाल-निळा दिवा लावून येणाऱ्या या अधिकारी कोण? अशी चर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात होत असे.

controversial trainee ias officer puja khedkar
पूजा खेडकर यांनी आता त्यांच्यावर झालेल्या आरोप प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे आणि माध्यमांनाच प्रश्न विचारला आहे. twitter

पूजा खेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं चेंबर बळकावलं

पूजा खेडकर यांचे वरिष्ठ मुंबईत आल्यानंतर पूजा खेडकर यांनी त्यांच्या वरिष्ठाचं चेंबर बळकावलं आणि तिथे स्वतःच्या नावाची पाटी लावली होती. तसंच वरिष्ठांच्या चेंबरमध्ये असलेलं सामान बाहेर काढलं होतं आणि तिथे आपलं सामान ठेवल होतं. या वर्तनाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे अहवाल दिला आहे. या अहवालात जिल्हाधिकाऱ्यांनी, ‘माझे कार्यालय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशेजारी हवं, ‘मला कार्यालयाबाहेर शिपाई हवा’ आणि ‘हीच कार हवी’ असे हट्ट पूजा खेडकर यांनी केल्याची बाब नमूद आहे. तसंच अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात येतात आणि तिथल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांशी उर्मटपणे बोलतात. ‘तुम्ही सगळे माझ्या मुलीला त्रास देत आहात, आयुष्यात तुम्हाला तिच्याएवढी पोस्ट मिळणार नाही. माझ्या मुलीला त्रास दिलात तर भविष्यात तुम्हाला याचा त्रास होईल अशी धमकीही देतात. अशीही चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर्तुळात होती.

हे पण वाचा- Manorama Khedkar Video : “…म्हणून मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल काढले”, पूजा खेडकरंच्या वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण

पूजा खेडकर यांचं म्हणणं काय?

“माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. मात्र भारताच्या संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे, जोपर्यंत एखाद्यावरचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत ती व्यक्ती आरोपी कशी काय ? असं पूजा खेडकर म्हणाल्या. तसंच माध्यमांद्वारे जे आरोप करण्यात येत आहेत त्यावरही मी माझं म्हणणं केंद्राच्या समिती पुढे मांडणार आहे. कोणी काहीही आरोप केले तरीही मी त्या आरोपांचं उत्तर समितीसमोर देईन. प्रशासन कसं चालतं आणि कामं कशी होतात हे सगळ्या जनतेला ठाऊक आहे. माध्यमांकडून माझ्यावर आरोप होत आहेत आणि ते जनतेसमोर मांडले जात आहेत. मी माझं म्हणणं चौकशी समिती समोर मांडेन” असं पूजा खेडकर यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.