राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईबाबत मोठं विधान केलं आहे. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना चारवेळा कामावर हजर राहण्याची आणि कारवाई मागे घेण्याबाबत संधी दिली. मात्र, यानंतरही कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे आता या कामगारांवरील कारवाई मागे घेण्यात येणार नाही, असं मत मंत्री अनिल परब यांनी सोलापुरात व्यक्त केलं आहे.

अनिल परब म्हणाले, “आम्ही आमच्याकडून २ नाही, तर ४ पावलं पुढे गेलो. मी एस. टी. कामगारांवर कारवाई होणार नाही यासाठी चारवेळा संधी दिली होती. याबाबतीत वेळोवेळी आवाहन करूनही एसटी कामगार कामावर परतले नव्हते. आता कर्मचाऱ्यांनी अगोदर कामावर रुजू व्हावं त्यानंतर कोणाशीही बोलणी करायला सरकार तयार आहे.”

“आत्तापर्यंत सरकारनं ५० एसटी कर्मचाऱ्यांच्या गटांना भेटी दिल्या”

“ज्या एसटी कामगारांवर आता कारवाई करण्यात आलेली आहे ती माघारी घेण्यात येणार नाही. दिवाळीच्या अगोदर आत्तापर्यंत सरकारनं ५० एसटी कर्मचाऱ्यांच्या गटांना भेटी दिल्या आहेत. २८ युनियनच्या कृती समितीबरोबर करारही केला आणि बाकीच्या मागण्या मान्य केल्या. यानंतरही ते आंदोलन मागे घेत नाहीत याचा अर्थ एसटी कामगारांचे आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटत चाललं आहे,” असं अनिल परब यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : अनिल परबांच्या आवाहनानंतर राज्यात १९ हजार एसटी कर्मचारी कामावर परतले!

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवाला धोका या हवेतल्या गोष्टी आहेत. त्यांच्या जर जीवाला धोका असेल, त्यांनी रीतसर पोलीस संरक्षण मागावं. शासन त्यांना संरक्षण देईल. कोणाच्याही जीवाला धोका करण्याची इच्छा नाहीये, असंही अनिल परब यांनी नमूद केलं.