सातारा : वाई-सुरूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या ब्रिटिशकालीन झाडांना हटविण्याविरोधात मोठे आंदोलन उभे राहिले आहे. यामुळे हा प्रश्न चिघळला आहे. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी वृक्षतोड करण्यास बंदी घातली आहे. हा बंदीचा आदेश झुगारून ठेकेदाराकडून बेसुमार वृक्षतोड केली आहे. ठेकेदारांची ही मनमानी झाडांच्या मुळावर उठली आहे. याचा पर्यावरणप्रेमींकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

वाई ते सुरूर महाबळेश्वर प्रतापगड पोलादपूर रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. यामध्ये ब्रिटिशकालीन झाडे कापली जाणार आहे. झाडे तोडू नये, यासाठी पर्यावरणप्रेमींनी दुचाकी रॅली व पदयात्रा काढली. याबाबत प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी परवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही झाडाला हात न लावता महामार्गाचे काम चालू ठेवण्यास परवानगी असल्याचे स्पष्ट केले. मात्र, याच आदेशाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष करत राजरोसपणे झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे.

या रस्त्यावर संबंधित ठेकेदाराने पोकलेन व जेसीबीच्या झाडाच्या सर्व बाजूंनी झाडाच्या मुळ्या मोकळ्या केल्या आहेत. जेणेकरून जरा धक्का जरी लागला तरी झाड उन्मळून पडणार आहे. या रस्त्यावर अशी ८० झाडे आहेत. परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगून रुंदीकरणात अडसर ठरणारी झाडे तोडली जात आहेत. कुणालाही न जुमानता अशा प्रकारे वृक्ष तोड करण्यात येत असेल तर रस्त्याच्या ठेकेदारावर त्वरित कारवाई करावी अन्यथा रस्त्याचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे-बंगळूर महामार्गापासून सुरूर वाई पाचगणी महाबळेश्वर प्रतापगड या मार्गाचे या रस्त्याचे रुंदीकरण सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणांमध्ये येणारी झाडे हटविली जाणार आहेत. ज्याला पर्यावरणप्रेमीचा मोठा विरोध आहे. ही झाडे हटविण्या विरोधात मोठे आंदोलन उभारले आहे. वेगवेगळ्या पातळीवर जुनी झाडे तोडली जाऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र वाईबाहेरचे राजकीय पाठबळ असणाऱ्या ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने झाडे तोडणे, हटविणे, फांद्या छाटणे असे काम सुरू आहे. यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. अशाच पद्धतीने झाडे तोडण्याचे काम सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन उभारले जाणार आहे.- प्रशांत डोंगरे, पर्यावरणप्रेमी, वाई