निखील मेस्त्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखिल भारती खुली पोल क्रीडा स्पर्धेत काकडीपाडय़ाती स्वाती संतोष काकराचे यश

नागपूरच्या गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित अखिल भारतीय खुली पोल क्रीडा स्पर्धेत (ऑल इंडिया ओपन पोल स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०१९)  पालघर तालुक्याच्या धुकटन गावातील काकडीपाडा या एका छोटय़ा खेडय़ातील आदिवासी तरुणी स्वाती संतोष काकरा हिने  सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.  कोणतेही अद्ययावत साहित्य नसतानाही हलाखीच्या परिस्थितीत प्रशिक्षण घेत तिने जिद्दीने हे पदक मिळविले आहे.

क्रिकेट, कबड्डी आणि टेनिससारख्या प्रसिद्धीवलय लाभलेल्या खेळापासून दूर आणि नवख्या असलेल्या पोल स्पोर्ट्समध्ये स्वातीला प्रशिक्षक राजमहेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, असे स्वतीचे वडील संतोष काकरा यांनी सांगितले आहे.

स्वाती हिने या स्पर्धेतील १४ ते १८ वयोगटात सुवर्णपदकाची कमाई केली. पोल स्पोर्ट हा क्रीडाप्रकार जगभरात ओळखला जात असला तरी भारतात तो नवखा खेळ आहे. मात्र अशातही ग्रामीण भागात नवख्या असलेल्या या खेळात लोखंडी स्थिर व फिरत्या पाइपवर कठीण कवायती/प्रात्यक्षिके कराव्या लागतात. स्वातीने आपल्या घरासमोरच्या झाडाला पाइप बांधून सुरक्षेच्या साधनांशिवाय सराव केला होता. काही महिन्यांपूर्वी ठाणे येथे झालेल्या राज्य स्पर्धेतही स्वातीने कांस्यपदक मिळविले होते. त्यानंतर तिची निवड राष्ट्रस्तरीय स्पर्धेत झाली.  तिने केलेली मेहनत हेच तिच्या या चांगली कामगिरी केल्याचे फलित असल्याचे तिचे पालघरमधील प्रशिक्षक राजमहेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. स्वाती हिला आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भाग घ्यावयाचा आहे. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेची प्रथम निवड चाचणी पात्रता फेरी कोरिया येथे होणार असून त्यानंतर तेथून निवड झालेल्या खेळाडूंना अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेता येणार आहे.  स्वाती हिची घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे तिला या स्पर्धेसाठी आर्थिक मदतीची गरज लागणार आहे, त्याचप्रमाणे तिच्या या खेळाच्या प्रशिक्षणासाठी तिला साहित्याचीही आवश्यकता आहे. यासाठी तिला मदत व्हावी व आंतरराष्ट्रीय पातळीवर तिने भारताचे प्रतिनिधित्व करून भारताचे नाव कमी व्हावे यासाठी तिच्या मदतीसाठी तिच्या पालकांनी तसेच प्रशिक्षकांनी आवाहन केले आहे.

पोल क्रीडा प्रकार असा आहे

पोल क्रीडा प्रकारात दोन इंचांच्या गुळगुळीत दोन स्टील पाइपवर प्रात्यक्षिक करावे लागते.  या खेळांमध्ये दोन इंचांचे दोन पाय दहा फुटांच्या अंतरावर जमिनीत रोवलेले असतात, यापैकी एक पोल हा स्थिर तर एक पोल हा फिरत असतो. या दोन्ही स्टील पोलवर एकूण अकरा प्रात्यक्षिके दाखवावी लागतात. या प्रात्यक्षिकांपैकी दोन प्रात्यक्षिके ही फिरती तर चार प्रात्यक्षिके ही अंगवळणी पाडणारी तर पाच प्रात्यक्षिके ताकदीची असतात.  या प्रात्यक्षिकांवर प्रशिक्षक गुण ठरवतात. ही स्पर्धा सुमारे ११० गुणांची असते व ती वेगवेगळ्या वयोगटांत खेळली जाते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribal womens get gold medal
First published on: 23-05-2019 at 00:13 IST