भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई बारामती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. “भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यास १०० टक्के ही निवडणूक लढेन” असंही त्यांनी म्हटलं आहे. तृप्ती देसाई या २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तसेच शिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावरून स्त्रियांना पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. तेव्हापासून अनेक आंदोलनं आणि वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे त्या चर्चेत असतात. आता बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने देसाई चर्चेत आल्या आहेत.

तृप्ती देसाई म्हणाल्या की, राज्यातल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचं काम ठिक सुरू आहे. खूप चांगलं काम चाललंय किंवा खूप वाईट काम सुरू आहे असं मी म्हणणार नाही. दरम्यान, तृप्ती देसाई म्हणाल्या की, कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी १०० टक्के बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढेन. भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाने मला विचारलं तर मी निवडणूक लढेनच. टीव्ही ९ मराठीशी बातचित करताना त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.

आम आदमी पार्टीकडून ऑफर

देसाई म्हणाल्या की, आजच आम आदमी पार्टीचे नेते त्यांच्या काही वरिष्ठ नेत्यांचा निरोप घेऊन मला भेटायला आले होते. आमच्या पक्षात प्रवेश करा, आम्ही तुम्हाला बारातमीतून लोकसभेची उमेदवारी देऊ, असं त्यांनी मला सांगितलं आहे. अनेक पक्षांचे मला फोन येत आहेत. परंतु मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच पुढचा निर्णय घेणार आहे. आगामी काळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशीच निवडणूक होऊ शकते.

हे ही वाचा >> “राहुल गांधींना अंदमानच्या तुरुंगात एसी लावून देतो, हिंमत असेल तर एक रात्र फक्त…” देवेंद्र फडणवीस यांचं खुलं आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे गेल्या १४ वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत. त्यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे बारामतीचे खासदार होते. १९९१ पासून हा मतदार संघ पवार कुटुंबाकडे आहे. आता त्यांना तृप्ती देसाई यांनी आव्हान दिलं आहे.