तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिलेल्या भेटवस्तूंवर विश्वस्तांनी केलेला खर्च अचंबित करणारा असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. सोनिया गांधींपासून विलासराव देशमुखांपर्यंत आणि आसारामबापूपासून बाबा रामदेवापर्यंत प्रत्येकाला सोन्याची मूर्ती, चांदीची तलवार, चांदीची मूर्ती, चांदीचा रथ, महावस्त्र, बनारसी फेटा, महागडय़ा पठणी, शालू अशा मंदिरातील वस्तू ‘आशीर्वाद’ म्हणून देऊन टाकल्या आहेत. असा ‘आशीर्वाद’ घेणारे नेते नेहमी मंदिरात येतात आणि त्यांना नेहमी भेटवस्तूही मिळते. भेट दिलेल्या चांदीच्या प्रत्येक मूर्तीचे वजन अडीचशे ग्रॅम आहे.
भेटवस्तू मिळालेल्या या अतिमहत्त्वाच्या भाविकांची यादी तब्बल २०० पानांची आहे. यात केलेले सत्कार आणि दिलेल्या मौल्यवान आशीर्वादपर भेटवस्तू घेणाऱ्यांच्या यादीत दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पाच वेळा सत्कार करण्यात आला.प्रत्येक वेळी त्यांना चांदीची मूर्ती देण्यात आली. शिवराज पाटील चाकूरकर यांचा चार वेळा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार िशदे, नारायण राणे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख, बसवराज पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, राजेश टोपे, राजीव सातव, राधाकृष्ण विखे पाटील, अनिल तटकरे, प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना दोन वेळा मौल्यवान वस्तूंची भेट देण्यात आली. सोन्या-चांदीच्या या वस्तू भेट म्हणून का दिल्या गेल्या, कोणत्या ठरावाने अशा वस्तू देण्याचे ठरविले होते, याची माहिती मंदिर समितीकडून मिळू शकली नाही. विजयसिंह मोहिते-पाटील यांना तर सोन्याची मूर्तीही भेट दिल्याची नोंद आहे. माहितीच्या अधिकारात पुजारी मंडळाचे किशोर गंगणे यांनी ही माहिती मिळविली. केवळ मंत्रिमंडळातील सदस्यच नाही, तर उच्चपदस्थ अधिकारी आणि त्यांचे नातेवाईकही यात आहेत. उच्चपदस्थ अधिकारी आपल्या पत्नीसमवेत दर्शनाला आले असता त्यांना शालू, पठणी, महागडय़ा साडय़ा, महावस्त्र ‘आशीर्वाद’ म्हणून दिले गेल्याची नोंद आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचे सासू-सासरे, पोलीस अधीक्षकांचे मामा-मामी, तहसीलदार साहेबांचे साडू-मेहुणी, आयुक्त साहेबांचा मुलगा, जावई, गाडीचा चालक आणि त्यांचे मित्र यांच्यावर देखील अशा प्रसादाची मुक्त उधळण करण्यात आली आहे. सामान्य भाविकांनी जगदंबेच्या चरणी अर्पण केलेल्या देणगीतून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर करण्यात आलेला कोटय़वधींचा खर्च वसूल करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही गंगणे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदाराच्या भावाच्या दुकानातून खरेदी
मंदिर संस्थानचे विश्वस्त असलेल्या स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनीही मोठय़ा आनंदाने वेळोवेळी हा सोन्या-चांदीचा प्रसाद आपल्या घरी नेला आहे. विश्वस्त स्थानिक आमदार मधुकर चव्हाण यांनी तर दरवर्षी आपला सत्कार करवून घेतला आहे. सत्काराच्या साहित्याची खरेदी आमदार चव्हाण ंअसा आरोप किशोर गंगणे यांनी केला आहे. माहितीत ‘चव्हाण’ यांच्या दुकानातून खरेदी होते, एवढाच उल्लेख आहे.

उच्चपदस्थ अधिकारी आपल्या पत्नीसमवेत दर्शनाला आले असता त्यांना शालू, पठणी, महागडय़ा साडय़ा, महावस्त्र ‘आशीर्वाद’ म्हणून दिले गेल्याची नोंद आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचे सासू-सासरे, पोलीस अधीक्षकांचे मामा-मामी, तहसीलदार साहेबांचे साडू-मेहुणी, आयुक्त साहेबांचा मुलगा, जावई, गाडीचा चालक आणि त्यांचे मित्र यांच्यावर देखील अशा प्रसादाची मुक्त उधळण करण्यात आली आहे.

सर्वच मुख्यमंत्री, मंत्रिमहोदय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार औचित्याला धरून आहे. यापूर्वीच्या खर्चाबाबत मी अनभिज्ञ आहे. मात्र यापुढे नवीन नियमावलीनुसार काम होईल. सध्या आर्थिक कामकाजाबाबत काटेकोर नियम तयार केले जात आहेत.
डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी व मंदिर संस्थानचे अध्यक्ष

पाहुण्यांचे सत्कार करणे ही संस्थानाची पूर्वापार प्रथा आहे. सत्कारासाठी लागणारे साहित्य माझ्या भावाच्या दुकानातून खरेदी केले जाते, हे खरे आहे. मात्र याचा सर्वस्वी निर्णय विश्वस्तांचा असतो. त्यानुसार अन्य दुकानांतूनही खरेदी केली आहे. मी स्वत: एकदाही सत्कार स्वीकारलेला नाही.
आ. मधुकर चव्हाण, विश्वस्त

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulja bhavani temple pour blessings to vip
First published on: 10-08-2015 at 03:56 IST