जालना : जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव देवी गावाच्या परिसरात रविवारी दोन चुलत भावांचा नाल्यात बुडाल्याने मृत्यू झाला. रविवारी सायंकाळनंतर त्यांचे मृतदेह सापडले. कुणाल राहुल खरात (१०) आणि युवराज गौतम खरात (७), अशी मृतांची नावे आहेत. ते पोहण्यासाठी नाल्यात उतरले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.

दुपारी आई-वडिलांसोबत शेतात गेले होते. परंतु दोन-तीन तास दिसले नाहीत म्हणून नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. सायंकाळनंतर नाल्याच्या काठावर त्यांच्या चपला आणि कपडे आढळले. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. जाफराबाद पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.