अवकाळी पावसाने घेतला दोघांचा बळी

अवकाळी पावसाने तालुक्यातील दोघांसह एका शेळीचा बळी घेतला. खडकवाडी येथे गुरुवारी सायंकाळी सात वर्षांची मुलगी वादळामुळे घराचे पत्रे उडून निखळलेल्या विटा डोक्यात पडून मरण पावली, तर शुक्रवारी राळेगणथेरपाळ येथे वीज कोसळून एक शेतकरी जागीच मृत्युमुखी पडला.

गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील दोघांसह एका शेळीचा बळी घेतला. खडकवाडी येथे गुरुवारी सायंकाळी सात वर्षांची मुलगी वादळामुळे घराचे पत्रे उडून निखळलेल्या विटा डोक्यात पडून मरण पावली, तर शुक्रवारी राळेगणथेरपाळ येथे वीज कोसळून एक शेतकरी जागीच मृत्युमुखी पडला. त्याच्यासोबत असलेली शेळीही यात दगावली. गारपिटीमुळेही शेकडो एकर डाळिंबाच्या बागा तसेच पिके उद्ध्वस्त झाली आहेत.  
तालुक्यातील खडकवाडी परिसरातील चिमणीबारव येथे गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक घरांवरील छपरे उडून अनेक कुटुंबे उघडय़ावर आली आहेत. घरावरील पत्रे उडून भिंतीच्या विटा डोक्यात पडल्याने चिमणीबारव येथे मल्लिका चिमा मधे ही सात वर्षांची आदिवासी मुलगी जागीच मृत्युमुखी पडली.
खडकवाडीपाठोपाठ तालुक्याच्या कुकडी पट्टय़ाला गारपिटीने लक्ष्य केले. विजेच्या कडकडाटासह दुपारी चारच्या सुमारास गारपिटीसह प्रारंभ होऊन वीज कोसळल्याने राळेगणथेरपाळ येथे शिवाजी किसन ढोमे (वय ४०) हा शेतकरी जागीच ठार झाला. पाऊस व विजांच्या कडकडाटामुळे ढोमे हे घरी परतण्याच्या मन:स्थितीत असतानाच अचानक मोठा आवाज होऊन त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात ढोमे यांच्यासह त्यांच्याजवळ असलेली शेळीही मृत्युमुखी पडली.
या घटनेची माहिती समजल्यानंतर माजी सभापती सुदाम पवार, तहसीलदार चंद्रशेखर देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
तालुक्यातील गुणौरे, गाडीलगाव, म्हसे, राळेगणथेरपाळ तसेच कोहकडी येथे शुक्रवारी झालेल्या गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. गारपीट सुरू झाल्यानंतर काही वेळातच जमिनीवर एक इंच जाडीचा गारांचा थर जमा झाला होता. गेल्या महिन्यात कोहकडी व म्हसे येथे गारपिटीने खचलेला शेतकरी सावरला नसतानाच पुन्हा गारपीट झाल्याने शेतकऱ्यांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. गुणौरे, गाडीलगाव, राळेगणथेरपाळ येथील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी माजी सभापती सुदाम पवार यांनी कृषी अधिकारी रामदास दरेकर यांच्याकडे केली. या अवकाळी संकटामुळे या भागातील सुमारे पाचशे एकर क्षेत्रावरील डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून टरबूज, खरबूज, ऊस, मका, यासह कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. आमदार विजय औटी विधिमंडळाच्या अधिवेशनात आहेत. त्यांनी मुंबईहून या घटनांची माहिती घेतली. मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना योग्य मदत मिळण्याबाबत तसेच फळबागा तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतही औटी यांनी सूचना दिल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two died due to odd time rain