सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात एका छोट्या हॉटेलमध्ये घरगुती स्वयंपाक गॅसचा स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेत दोन चिमुकल्या मुलींचा गंभीर भाजून मृत्यू झाला. तर त्यांच्या आई वडिलांसह चारजण भाजून जखमी झाले.

श्रेया दादासाहेब गंगथडे (वय एक वर्ष) आणि स्वरा दादासाहेब गंगथडे (वय दोन वर्षे) अशी या दुर्घटनेतील दुर्देवी मृत कोवळ्या जीवांची नावे आहेत. त्यांचे वडील दादासाहेब विष्णू गंगथरे आणि आई अनुजा यांच्यासह बहीण मोनाली तसेच सुनील राहुल गंगथडे यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मंगळवेढा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार गंगथडे कुटुंबीयाचा गावात छोटेखानी हॉटेल व्यवसाय आहे. तेथेच गंगथडे कुटुंबीय राहून स्वतः खाद्यपदार्थ, चहा तयार करून ग्राहकांना विकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुपारी अडीचच्या सुमारास हॉटेलमध्ये घरगुती स्वयंपाक गॅसवर शेव बनविले जात होते. त्यावेळी गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर काढताना आगीचा भडका उडाला. त्यातच गॅस पाईपला गळती झाली. त्यामुळे मोठा स्फोट झाला. यात गंगथडे कुटुंबातील दोघा चिमुकल्या जीवांचा होरपळून मृत्यू झाला. तर कुटुंबातील अन्य चौघे भाजून जखमी झाले.