वाई: पुणे बंगळूर महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडून पुण्याकडे जाताना एस वळणावर झालेल्या चार अपघातात दोन ठार एक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी अद्यापही कायम आहे.सातारा व पुण्याकडे जाणारी वाहतूक एकदम संथ गतीने सुरु आहे.वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुण्याकडून साताराकडे जाणारी वाहतूक शिरवळ येथील पंढरपूर फाट्यावरून लोणंदमार्गे साताऱ्याकडे वळवली आहे.

 पुणे सातारा महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडून पुण्याकडे जाताना एस वळणावर झालेल्या अपघातात एक दुचाकी घसरून त्यावरील युवक युवती माल ट्रक खाली येऊन  जागीच ठार  झाले.त्यांच्या बाबत जास्य माहिती उपलब्ध झाली नाही.अन्य अपघातात एक जण जखमी झाला.या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले.खंडाळा,महामार्ग व भुईंज पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.पुणे सातारा रस्त्यावर व खंबाटकी घाट व बोगदा मार्गावर अनेक वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

अपघात झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सातारा कोल्हापूर सांगली बंगळूर कडे खंबाटकी घाटातून जाणारी वाहतूक बंद करून शिरवळ येथील पंढरपूर फाट्यावरून लोणंद मार्गे साताऱ्याकडे वळविण्यात आली आहे. गणेशोत्सवामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.त्यामुळे वाहन चालक संताप व्यक्त करत आहेत. शनिवार सायंकाळ पासून महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. महामार्ग वाहतूक, शिरवळ, खंडाळा, भुईंज, सातारा पोलीस अविरत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.नागरिकांनी महामार्गावर रात्रीची गर्दी करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.