धवल कुलकर्णी
चंद्रपूर जिल्ह्यात शॉक लागून दोन बिबटे आणि दोन अस्वलांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी शस्त्रास्त्रं निर्मितीच्या कारखाना परीसरात ही घटना घडली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि ब्रह्मपुरी वन विभाग हा वाघ, बिबटे आणि इथर वन्य प्राण्यांचा वावर असलेला परीसर आहे. मात्र अशा घटना घडल्या की या प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो.
व्ही रामराव, मुख्य वन्यजीव संरक्षक, चंद्रपूर वनविभाग, यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना भद्रावती येथील शस्त्र निर्मितीच्या कारखाना परिसरात घडली. रामाराव म्हणाले “येथे दोन बिबटे आणि दोन अस्वल मृतावस्थेत सापडले. त्यांच्या मृत्यूमागचं कारण म्हणजे कुणीतरी विजेची तार टाकून त्याला वीजेने प्रवाहित करणे हे असू शकते. एकूण परिस्थिती पाहता या मृत्यु मागे electrocution हेच कारण असू शकतं” अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. घटनेबाबत वनविभागाचे कर्मचारी अधिक तपास करत आहेत.
चंद्रपूरचे मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे यांनी असे नमूद केले ही प्राण्यांची हत्या झालेला भाग हा जंगलाने व्यापलेला असला तरीसुद्धा तो संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. अशा संवेदनशील भागामध्ये येऊन लोक तृणभक्षक प्राणी मारायला वायर लावत असतील तर सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर विषय आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. धोत्रे म्हणाले की या घटनेत प्राणी साधारणपणे चार ते पाच दिवसापूर्वी मृत्यू पावले होते व त्यांचे मृतदेह खराब झाले होते.