लोकसत्ता वार्ताहर

नांदेड : पचनसंस्थेतील वेगवेगळ्या विकारांचे विशेषज्ञ डॉ.कैलाश कोल्हे आणि क्ष-किरण शास्त्रातील आधुनिक प्रणालीतून उपचार करणारे डॉ.अमित बन या नांदेडमधील तरुण डॉक्टरांनी मागील दोन वर्षात गंभीर अवस्थेतील अनेक रुग्णांना बरे केल्यानंतर त्यांच्याच संयुक्त उपचारांमुळे यकृतातील बिघाडामुळे अत्यंत गंभीर अवस्थेत गेलेल्या एका तरुण रुग्णाला जीवदान मिळाले आहे.

अलीकडच्या काळात २५ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये यकृताशी संबंधित विकारांचे प्रमाण आणि त्यातील गुंतागुंत वाढली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील एक रुग्ण सतत होणार्‍या रक्ताच्या उलट्या आणि त्यामुळे ढासळलेली प्रकृती यांवरील उपचारांसाठी डॉ.कोल्हे यांच्याकडे आला होता.

अति मद्यप्राशनातून ही परिस्थिती उद्भवल्याचे निदान झाल्यानंतर वरील रुग्णाची एन्डोस्कोपी करण्यात आली. लिव्हर सिर्‍होसिसमुळे या रुग्णाच्या जठराच्या आतील भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये दाब (प्रेशर) वाढल्यामुळे रक्तस्राव होऊन हिमोग्लोबीनचे प्रमाण खूप खालावले होते. या रुग्णाच्या जठरातून होणारा रक्तस्राव एन्डोस्कोपीच्या माध्यमातून थांबवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ.कोल्हे यांनी इन्टरव्हेन्शनल रेडिओलॉजीस्ट डॉ.अमित बन यांची मदत घेण्याचे ठरविले.

डॉ.बन यांनी यापूर्वी डॉ.कोल्हे तसेच शहरातील इतर डॉक्टरांकडे गंभीर अवस्थेत गेलेल्या अनेक रुग्णांवर क्ष-किरणशास्त्रातील आपल्या कौशल्याद्वारे यशस्वी उपचार केले आहेत. वरील रुग्णाची एकंदर स्थिती पाहिल्यानंतर डॉ.अमित यांनी रुग्णाच्या जांघेतील शिरेतून कॅथेटर घालत ज्या ठिकाणी रक्तस्राव होत होता तो शिताफीने थांबविला. नांदेडमध्ये अशा उपचारपद्धतीचा प्रथमच वापर केला गेला. या रुग्णाचे हिमोग्लोबीन ४ पर्यंत खाली आले होते, पण नंतरच्या चार दिवसांतच ते ११ पर्यंत पोहोचले. तसेच रक्ताच्या उलट्याही थांबल्या. अशा उपचारांसाठी मोठ्या महानगरांतील रुग्णालयांमध्ये काही लाख रूपये खर्च करावे लागले असते; पण नांदेडच्या या दोन तरुण डॉक्टरांनी माफक खर्चात या रुग्णावर यशस्वी उपचार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पचनसंस्थेतील गंभीर आणि गुंतागुंतीच्या विकाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील काही वर्षांपूर्वी नांदेड व आसपासच्या जिल्ह्यातील अशा रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी जावे लागे. पण आता अत्यंत गुंतागुंतीच्या आजारांवरील उपचार नांदेडच्या रुग्णालयांमध्येच होत आहेत. गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजीस्ट आणि इन्टरव्हेन्शनल रेडिओलॉजीस्ट यांच्यातील समन्वयातून पचनसंस्थेतील आजाराचे उपचार आता सहज झाले आहेत.