सांगली : भिलवडीजवळ दुधाने भरलेला टँकर उलटून झालेल्या दुर्घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे दोन वाजणेच्या सुमारास घडली.सरूड (ता. शिराळा) येथून दुधाचा टँकर दूध भरून भिलवडी येथील चितळे डेअरीकडे येत होता. आज पहाटे दोन वाजणेच्या सुमारास खंडोबाची वाडी बस थांब्यावर आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला.

या अपघातात टँकरचे चालक प्रशांत देवकुळे (वय २३) व तेजस भोरे (वय १९, दोघेही रा. नेहरूनगर, निमणी) हे दोघे गंभीर जखमी झाले. टँकर रस्त्याकडेला असलेल्या एका घराच्या शौचालयावर उलटला. क्रेनच्या मदतीने चालक कक्षात अडकलेल्या दोघा तरुणांना बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.