कराड: कराड येथे पोलिसांनी गत पंधरवड्यात  पकडलेल्या एमडी ड्रग्जच्या रॅकेटमध्ये दोन बड्या घरातील दोघा तरुणांना अटक केली आहे. एकास काल रात्री, तर दुसऱ्यास आज सोमवारी पहाटे परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पुण्याच्या विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे.सौरभ संदीप राव व सुजल उमेश चंदवानी अशी अटक केलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. सुजल चंदवानी याला पुण्याच्या विमानतळावर परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला गती येणार असून, अद्यापही काही लोकांचा या रॅकेटमध्ये समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्जच्या रॅकेट उघड होताना सुमारे ३० ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तर,  राहुल बडे (वय ३७ रा. सोमवार पेठ, कराड), समीर उर्फ सॅम शेख (वय २४ रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका, कराड) व तौसीब बारगिर (वय २७ रा. कार्वेनाका, कराड) यांना अटक झाली होती. तर अमित घरत (वय ३२, करंजवडे, पनवेल), दीपक सुर्यवंशी (वय ४३ रा. चाळीसगाव, सध्या तुर्भे-मुंबई), बेंजामिन ॲना कोरु (वय ४४ रा. कोपरखैरणे नवी मुंबई), रोहित शाह (वय ३१, रा. शनिवार पेठ, कराड), सागना मॅन्युअल (वय ३९ घणसोली नवी मुंबई), नयन मागाडे (वय २८ रा. डोंबिवली पूर्व जि. ठाणे), प्रसाद देवरुखकर (वय ३० पावसकर गल्ली, कराड), संतोष दोडमणी (वय २२ सैदापूर-कराड), फैज मोमीन (वय २६, रा. मार्केट यार्ड, कराड) यांना अटक करण्यात आली आहे.  या रॅकेटची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नुकताच पकडलेला सौरभ राव व सुजल चंदवानी हे दोघे बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर या दोघांनाही अटक झाली आहे. सुजल राव याच्या हालचालींवरही पोलिसांचे बारीक लक्ष होते. त्या दोघांचा या प्रकरणात थेट संबंध आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्याकडून बऱ्यापैकी माहिती हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांची तीन पथके चंदवानीच्या मागावर होती. चंदवानीने दोन वेळा पुण्यातच पोलिसांना गुंगारा दिला होता. काल रात्रीपासून त्याच्या मागावर पथक होते. तो परदेशी पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांची होती. त्यामुळे पोलिस त्याच्या हालचालीवर वॉच ठेवून होते. त्याला पहाटेच पुण्याच्या विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून आणखी काहींचा यातील सहभाग आणि धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.