करोना प्रतिबंधक बनावट लस प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. आता नवी मुंबईतही एप्रिलमध्ये पार पडलेला एका लसीकरण शिबिरात बनावट लस दिली गेल्याचे निष्पन्न झाले आहे . बनावट लस प्रकरणात अटक आरोपींनी याबाबत माहिती दिल्यावर हा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे ज्यांनी हा लसीकरण कार्यक्रम आयोजित केला होता, त्यांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. मनीष त्रिपाठी व करीम  अशी दोन आरोपींची नावे असून तिसऱ्या आरोपीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.  आरोपींना  मुंबई पोलिसांनी बोगस लसीकरण प्रकरणात अटक केलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून नवी मुंबईतील शिरवणे भागात एप्रिलमध्ये पार पडलेल्या लसीकरण शिबिरामध्ये बनावट लस दिली गेल्याची समोर आले आहे.

बोगस लसीकरणातील कुप्यांमध्ये पाणी

शिरवणे एमआयडीसीमध्ये अॅटोबर्ग टेक्नॉलॉजी प्रा.लि. ही कंपनी असून, या कंपनीतील सर्वांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानंतर सामायिक ओळखीतून कांदिवली येथील डॉ. मनीष त्रिपाठी यांचे नाव समोर आले, तसेच डॉ. मनीष यांचे कंदिवलीत रुग्णालय देखील असून, सर्व आर्थिक गोष्टी ठरवल्यावर २३ एप्रिल रोजी हे लसीकरण शिबिर घेण्यात आले. यामध्ये कंपनीतील कामगार व कर्मचाऱ्यांपैकी ३५२ जणांना लस देण्यात आली. यासाठी प्रतिलस १ हजार २३० रुपये  असा, एकूण ४ लाख ३३ हजार यात  येण्या-जाण्याचा खर्च ८ हजार ७०० असा वसूल करण्यात आला.

एक ते दोन दिवसात मोबाईलवर लस घेतल्याचे प्रमाणपत्र येईल किंवा लिंक येईल असे, कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. मात्र असा संदेश कुणालाही न आल्याने डॉ. त्रिपाठी यांच्याशी कंपनीने अनेकदा संपर्क साधला, मात्र दरवेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. ९ जून रोजी दोन कामगारांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र कोविन अॅप मधून मिळाले. तसेच, हे प्रमाणपत्र नानावटी रुग्णालयांनी दिले असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र ते खरंच नानावटी रुग्णालयाने पाठवले का? याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले की, या प्रकरणातील डॉ. मनीष त्रिपाठी हा आरोपी खरंच डॉक्टर आहे की नाही? याचीही चौकशी सुरु आहे. आरोपीवर ७ गुन्हे या पूर्वीच दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांनी लस ऐवजी काय दिले? याचाही तपास सुरु आहे. मुंबई पोलिसांकडून हस्तांतरण झाल्यावर केलेल्या चौकशीत नवीमुंबई बाबत अधिक माहिती समोर येणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Types of bogus vaccinations revealed in navi mumbai 352 people were vaccinated msr
First published on: 03-07-2021 at 16:58 IST